Homeताज्या बातम्याबीड

पोलिसांनी कारवाईत गोरक्षकांना सोबत घेतले, गोरक्षकांनी अर्ध्या रात्री कुलपं तोडली, घरात घुसलेपोलिस महासंचालकांचे पत्र असताना पेठ बीड पोलिसांना कारवाईच्या वेळी गोरक्षकांना सोबत घेण्याचा अधिकार कोणी दिला – शेख मुजीब

गुरांची अवैध वाहतूक करणार्या लोकांविरूध्द माहिती मिळाल्यानंतर त्या लोकांविरूध्द फक्त पोलीस किंवा इतर संबंधित अधिकार्यांनीच कारवाई करावी असे स्पष्

आरक्षण मिळाले नाही तर, आंदोलन तीव्र करणार
पत्नीने केली पतीची दगडाने ठेचून हत्या
जागतिक पातळीवर नगरचा झेंडा फडकवताना नगरी नगरकरांना मायभूमीच्या ऋणातून उतराई होण्याचा ध्यास-पदमश्री पोपटराव पवार



गुरांची अवैध वाहतूक करणार्या लोकांविरूध्द माहिती मिळाल्यानंतर त्या लोकांविरूध्द फक्त पोलीस किंवा इतर संबंधित अधिकार्यांनीच कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश राज्याच्या पोलीस महासंचालकांनी दि.7 ऑगस्ट 2025 रोजीच्या परिपत्रकाद्वारे दिलेले आहेत. कारवाईत कुठल्याही खाजगी व्यक्तींचा सहभाग असू नये असेही त्यामध्ये नमुद करण्यात आलेले आहे. असे असतांना दोन दिवसांपुर्वी पेठ बीड पोलीसांनी शहरातील मोमीनपुरा भागात गोवंशावर कारवाई करतांना खाजगी गोरक्षकांना सोबत घेतले होते. विशेष म्हणजे पोलीस पोहचण्या आधीच या गोरक्षकांनी मोमीनपुरा भागात जाऊन दरवाज्यांची कुलपं तोडली, बळजबरी घरात घुसले, दाबदडप केल्याचा प्रकार घडला आहे. सदरील प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले असून पोलीस कारवाईत गोरक्षकांना सोबत घेण्याचा अधिकार पेठ बीड पोलीसांना कोणी दिला ? असा प्रश्न उपस्थित होत असून एसपी साहेब, अशा प्रकारे कारवाई करून आणि गोरक्षकांना सोबत घेऊन बीडमध्ये दंगल घडवायची आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत या कारवाईविरूध्द न्यायालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) शेख मुजीब यांनी म्हटले आहे.
बीड शहरातील मोमीनपुरा भागात दोन दिवसांपुर्वी पेठ बीड पोलीसांनी कारवाई करत 47 गोवंशीय जनावरांची सुटका केली. कारवाईला विरोध नाही परंतू पेठ बीड पोलीसांनी ज्या पध्दतीने या कारवाईत गोरक्षकांना सहभागी करून घेतले होते ते अत्यंत चुकीचे आणि नियमबाह्य आहे. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार हयात असतांना जेष्ठ नेते नवाब मलीक, आ.सना मलीक यांच्यासह राज्यातील कुरेशी समाजातील प्रतिष्ठीत व्यक्तींनी त्यांची भेट घेवून गोवंश वाहतूक आणि कथीत गोरक्षकांकडून होणार्या हिंसाचाराविरूध्द न्यायाची मागणी केली होती. त्याचवेळी स्व.अजितदादांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची बैठक घेऊन या संदर्भात योग्य त्या सुचना करत परिपत्रक काढण्याचे आदेशित केले होते. त्यानुसार राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या मान्यतेने दि.7 ऑगस्ट 2025 रोजी कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.मनोजकुमार शर्मा यांनी परिपत्रक काढले होते. त्यामध्ये कोणत्याही कारवाईत खाजगी व्यक्तींना सहभागी करून घेऊ नये असे स्पष्ट निर्देश दिले होते. गाड्या अडवून तपासणी करणे, झडती घेणे, मारहाण करणे हे कायद्याला अनुसरून नाही असेही त्यामध्ये नमुद करण्यात आलेले आहे. सदरील परिपत्रक पुर्ण राज्यासाठी लागू असतांना पेठ बीड पोलीसांनी मात्र दोन दिवसांपुर्वी झालेल्या कारवाईत खाजगी तथा कथीत गोरक्षकांना सहभागी करून का घेतले ? पोलीस पोहचण्या आधीच त्या ठिकाणी गोरक्षक पोहचले होते, त्यांनी अनेक ठिकाणी दरवाज्याची कुलपं तोडली, घरात घुसले, दाबदडप केली. या प्रकारामुळे संबंधित कुरेशी समाजातील कुटूंबात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्याठिकाणी महिला, लहान मुले असतांनाही गोरक्षक मात्र त्यांच्या धुंदीत होते. एवढेच नव्हे तर त्यांनी त्याचे व्हिडीओ देखील तयार करून ते सोशल मिडियावर व्हायरल केले आहेत. सदरील प्रकार अतिशय गंभीर असून सोशल मिडियावर हे व्हिडीओ पाहूण अनेकांच्या मनात पोलीस आणि गोरक्षकांविषयी प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. सदरील व्हिडीओ चीड आणणारे असून अशा प्रकारामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते. एसपी साहेबांनी तात्काळ या प्रकरणाची चौकशी करावी, कारवाईचे व्हिडीओ फुटेज मागवून घ्यावे आणि तथाकथीत गोरक्षकांवर कारवाई करून त्यांना सहभागी करून घेणार्या पोलीस अधिकार्यांवरही कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शेख मुजीब यांनी केली आहे. या प्रकरणात न्यायालयातही जाणार असल्याचे शेख मुजीब यांनी म्हटले आहे.
कारवाईला विरोध नाही परंतू पध्दत बेकायदेशीर
बीड पोलीसांकडून झालेल्या कारवाईला विरोध नाही, नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे त्याबद्दलही दुमत नाही, परंतू ज्या पध्दतीने पेठ बीड पोलीसांनी गोरक्षकांना कारवाईत सहभागी करून घेतले ते अत्यंत चुकीचे आणि कायदेशिररित्या योग्य नाही. पोलीस कारवाई दरम्यान कोणत्याच खाजगी व्यक्तीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, मग पोलीसांनी त्या गोरक्षकांना सोबत घेत कारवाई कशी केली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोनि.पाटील यांनी दि.7 ऑगस्ट 2025 रोजीच्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकाचे उल्लंघन केले असून या विरूध्द न्यायालयात जाणार असल्याचे शेख मुजीब यांनी म्हटले आहे.
पर जिल्ह्यातील गोरक्षक बीडमध्ये कसे? कोणी आणले तर नाही ना?
बीड शहरात पोलिसांनी मोमीनपुरा भागात केलेल्या कारवाई दरम्यान गोरक्षकांना सोबत घेतले होते. त्यातील सर्व गोरक्षक हे बाहेरच्या जिल्ह्यातील होते अशी माहिती समोर आली आहे. हे सर्व गोरक्षक बीड शहरातील बार्शी रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये थांबले होते. मग हे गोरक्षक नेमके कोणत्या जिल्ह्यातील होते? ते बीडमध्ये कसे आले? बीड शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी तर या गोरक्षकांना बीडमध्ये आणले नाही ना? अशीही शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेख मुजीब यांनी केली आहे.

COMMENTS