नांदेड : शहरातील नामांकित ’ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज’मध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यां

नांदेड : शहरातील नामांकित ’ग्रामीण पॉलिटेक्निक कॉलेज’मध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पुरवल्या जाणार्या पाण्याच्या फिल्टरमध्ये (वॉटर रेफ्रिजरेटर) मृत आणि जिवंत बेडूक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संतापलेल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर रेफ्रिजरेटरचा वापर करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पाण्याचा रंग बदललेला दिसत होता आणि त्यातून उग्र दुर्गंधीही येत होती. काही विद्यार्थ्यांनी पाणी पिताना हा बदल टिपला आणि त्यांना संशय आला. संशयावरून विद्यार्थ्यांनी जेव्हा वॉटर रेफ्रिजरेटरचे झाकण उघडून पाहिले, तेव्हा त्यांना आतमध्ये काही मृत आणि काही जिवंत बेडूक तरंगताना दिसले. हा धक्कादायक प्रकार पाहताच विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तात्काळ आपल्या मोबाईलमध्ये याचे चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडियावर प्रसारित केले. हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरभर चर्चेला उधाण आले असून पालकांनी कॉलेज परिसरात धाव घेत प्रशासनाला धारेवर धरले. विद्यार्थ्यांच्या जीवाशी असा खेळ कसा काय केला जाऊ शकतो? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी यापूर्वीही अनेकदा महाविद्यालय प्रशासनाकडे तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या होत्या. पाणी दूषित येत आहे, त्याला वास येतोय आणि स्वच्छतेचा अभाव आहे, हे वारंवार सांगूनही कॉलेज प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. प्रशासनाच्या याच बेजबाबदारपणामुळे आज ही वेळ ओढवली असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, पावसाळा नसतानाही अशा प्रकारे पाण्यात बेडूक किंवा इतर जीव असणे हे अत्यंत घातक आहे. दूषित आणि सडलेले पाणी पिल्याने कॉलरा, जुलाब, उलट्या, टायफॉइड आणि विविध प्रकारचे संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची शुद्धता राखणे गरजेचे असताना, येथे मात्र साध्या पाण्याच्या टाक्यांचीही स्वच्छता केली जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने तात्काळ महाविद्यालयातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावेत, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधित दोषी कर्मचार्यांवर आणि कॉलेज प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्हाला केवळ आश्वासन नको, तर सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अधिकार हवा, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील इतर शैक्षणिक संस्थांमधील स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या सोयींबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शिक्षण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS