बीड : जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील घरसूची व घरगणना ही प्रक्रिया राज्यात 1 मे 2026 पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर

बीड : जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील घरसूची व घरगणना ही प्रक्रिया राज्यात 1 मे 2026 पासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी पत्राद्वारे केले आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या मोहिमेला प्रारंभ करण्यात येणार असून, त्या दिवशी होणार्या विविध शासकीय कार्यक्रमांमध्ये जनगणनेची विशेष माहिती प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 1 मे रोजी आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमाच्या ठिकाणी जनगणनेचे माहिती फलक व स्टँडीज उभारण्यात येणार आहेत. तसेच मान्यवर व्यक्तींमार्फत ‘स्वयं-गणना’ करून नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश देण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय पालकमंत्री किंवा प्रथम नागरिक यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन जनगणनेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. ग्रामीण व शहरी भागात बॅनर, पोस्टर, फ्लेक्स, भित्तीलेखन यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रक्षेपण तसेच व्हॅन कॅम्पेनद्वारे जनगणनेच्या तारखांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे. उपलब्ध शासकीय यंत्रणेचा वापर करून ही मोहीम किफायतशीर व प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तालुका व नगरपरिषदांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून जनगणनेची माहिती, तसेच प्रशिक्षणाचे फोटो व व्हिडिओ प्रसारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डेटा प्रायव्हसीबाबत पसरू शकणार्या अफवांना आळा घालण्यासाठी प्रशासनाच्या समन्वयाने विशेष नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात येणार आहे. राबविण्यात आलेल्या सर्व उपक्रमांचे छायाचित्र व व्हिडिओ दस्तऐवजीकरण करून सविस्तर अहवाल तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हे काम अत्यंत महत्त्वाचे व कालबद्ध असल्याने कोणताही विलंब किंवा हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा जनगणना अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले आहे.

COMMENTS