मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नावा

मुंबई : राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच नावाभोवती महाविकास आघाडीत एकमत होत असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांच्या कार्यकाळानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार, याबाबत सुरू असलेली चर्चा आता निर्णायक टप्प्यात पोहोचताना दिसते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावरून स्पष्ट भूमिका घेत, उद्धव ठाकरे यांनीच ही निवडणूक लढवावी अशी आग्रही विनंती केली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचा कल ठाकरेंच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसकडूनही ठाकरेंच्या उमेदवारीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असल्याचे दिसते. काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही सार्वजनिकरित्या ठाकरेंनाच पाठिंबा असल्याचे संकेत दिले आहेत. या सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष-शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)-यांच्यात या जागेसाठी ठाकरेंच्या नावावर सहमती होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या संदेशात ठाकरेंच्या नेतृत्वाचा आणि अनुभवाचा विशेष उल्लेख केला. राज्याच्या राजकारणात त्यांचा दीर्घ अनुभव लक्षात घेता, विधानपरिषदेतील त्यांच्या उपस्थितीचा सभागृहाच्या कामकाजाला उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, या विनंतीचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS