Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरवर ‘महसूल’ची कारवाईशेवगावात नाराजगी ; अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप

शेवगाव  :  तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर सध्या सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विभागातील कारभाराबाबत अनेक प्रश

सावकाराचा त्रास; शेतकऱ्याची उपाधीक्षकांकडे धाव
किनवटमध्ये दिव्यांग कर्मचार्‍याला नगरसेवकाची मारहाण; काम बंद आंदोलनाचा इशारा!
“पाया पडतो, मारू नका” अशी विनवणी करणाऱ्या आदिवासी तरुणाला सिंगरौलीत अमानुष मारहाण

शेवगाव  :  तालुक्यातील महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर सध्या सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विभागातील कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. “चोर सोडून संन्याशाला फाशी” अशी परिस्थिती महसूल कार्यालयात निर्माण झाल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. याकडे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शुक्रवार, दि. १७ रोजी बक्तरपूर येथील शेतकरी विष्णू सावंत (गट क्र. २४७) हे आपल्या कांद्याच्या चाळीसाठी पत्र्याचे शेड उभारण्यासाठी स्वतःच्या विहिरीतील डबर ट्रॅक्टरद्वारे आणत होते. त्यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी लाल दिव्याच्या वाहनासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी संबंधित ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले.
स्थानिक नागरिकांनी हा माल स्वतःच्या शेतातील व वैयक्तिक वापरासाठी असल्याचे स्पष्ट करून कारवाई न करण्याची विनंती केली, मात्र अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, संबंधित शेतकऱ्याला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करावा लागला.
दरम्यान, तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या डंपर व हायवा वाहनांद्वारे गौण खनिजांची वाहतूक सुरू असल्याची चर्चा असताना, अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करून एका शेतकऱ्यावर कारवाई केल्याने महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  एकूणच, महसूल विभागाच्या कारभाराविषयी वाढत्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ स्तरावरून लक्ष घालून योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
चौकट : खाजगी व्यक्तीच्या वावराबाबत चर्चा
तहसील कार्यालयात एका खाजगी व्यक्तीचा नियमित वावर असल्याची चर्चा शहरात रंगत आहे. सदर व्यक्ती सकाळी लवकर कार्यालयात उपस्थित राहत असून, तहसीलदार व नायब तहसीलदार यांच्यासोबत मुक्तपणे वावरत असल्याचे सांगितले जाते. या बाबीची चौकशी होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
चौकट : शेतकऱ्यांच्या अधिकारांवर गदा?
महसूल नियमांनुसार शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतातील गौण खनिजांचा वापर शेती व घरगुती कामांसाठी करण्याचा अधिकार आहे. मात्र, या अधिकारांवर महसूल विभागाकडून अडथळे निर्माण होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS