Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. आंबेडकरांनी बहिष्कृतांच्या जीवनात आत्मसन्मानाचे बीज पेरले – डॉ. सतीश साळुंके

छ. संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिढ्यानपिढ्या बहिष्कृत असलेल्या वंचित व अस्पृश्य समाजाच्या मनात आत्मसन्मानाचे बीज रोवून चातुर्वर्ण व्य

भाजपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला स्वच्छता अभियान
किनवटमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी; भीम अनुयायांचा जनसागर
भगवान परशुराम व महात्मा बसवेश्वर यांचा आदर्श अंगिकारावा-आ.केराम

छ. संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिढ्यानपिढ्या बहिष्कृत असलेल्या वंचित व अस्पृश्य समाजाच्या मनात आत्मसन्मानाचे बीज रोवून चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांनी केले.
सामान्य न्याय व समाज कल्याण विभागाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त दीपक खरात, सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, व्हीजेएनटी विभागाचे उपसंचालक जलील शेख, तसेच जात पडताळणी विभागाच्या उपायुक्त मकरंद आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ. साळुंके पुढे म्हणाले की, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकरी व शोषित समाजाच्या वेदनांना वाचा फोडली, तर राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करून उपेक्षितांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पसरवला. गाडगेबाबांनी धार्मिक अंधश्रद्धा व दांभिकतेवर प्रहार करत मानवसेवा हीच ईश्वरसेवा हा विचार रुजवला. फुले, शाहू, आंबेडकर आणि गाडगेबाबा यांच्या विचारसरणीला एकत्र जोडल्याशिवाय सामाजिक परिवर्तन पूर्ण होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. संविधान हे कोणत्याही धर्मग्रंथापेक्षा श्रेष्ठ असून ते मानवी आचरणाला कायद्याच्या चौकटीत दिशा देणारे आहे, असेही त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र खरंच फुले-शाहू-आंबेडकर-गाडगेबाबांचा आहे का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शेतकरी आत्महत्या, सामाजिक अन्याय, शिक्षणातील आर्थिक विषमता आणि वाढत्या अंधश्रद्धा यावर चिंता व्यक्त केली. या समस्या दूर करण्यासाठी महामानवांच्या विचारांचा अंगीकार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात विविध लाभार्थ्यांना डॉ. साळुंके यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली.

COMMENTS