मुंबई : देशातील शेतकरी, उद्योग आणि एकूणच अर्थचक्राचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून 2026 संदर्भात पहिला अधिकृत अंदाज आज जाहीर करण्यात आला.

मुंबई : देशातील शेतकरी, उद्योग आणि एकूणच अर्थचक्राचे लक्ष लागून राहिलेल्या नैऋत्य मान्सून 2026 संदर्भात पहिला अधिकृत अंदाज आज जाहीर करण्यात आला. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात सरासरीच्या सुमारे 92 टक्के पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण ‘सरासरीपेक्षा कमी’ या श्रेणीत मोडत असल्याने कृषी क्षेत्रासह अर्थव्यवस्थेसाठी सावधगिरीचा इशारा मानला जात आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी हा अंदाज जाहीर केला. त्यांच्या मते, यंदाच्या मान्सूनवर ‘एल निनो’ या जागतिक हवामान घटकाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. विशेषतः जुलै ते सप्टेंबर या कालावधीत ही स्थिती निर्माण होऊ शकते, ज्यामुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तथापि, काही प्रमाणात दिलासा देणारी बाब म्हणजे हिंदी महासागरातील ‘भारतीय महासागर द्विध्रुव’ स्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. ही स्थिती ‘एल निनो’च्या प्रतिकूल परिणामांना काही प्रमाणात आळा घालू शकते. त्यामुळे पावसातील संभाव्य तूट पूर्णपणे गंभीर स्वरूप धारण करणार नाही, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून ते ऑगस्ट या सुरुवातीच्या काळात पावसाची स्थिती तुलनेने सामान्य राहू शकते, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले. यंदाचा अंदाज ‘सरासरीपेक्षा कमी’ या श्रेणीत येत असल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या, जलसाठे आणि पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. देशातील मोठा कृषी भाग अजूनही पावसावर अवलंबून असल्याने, या अंदाजामुळे शेतकरी व धोरणकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तज्ज्ञांच्या मते, केवळ पावसाचे एकूण प्रमाणच नव्हे तर त्याचे कालानुसार व प्रदेशानुसार वितरण अधिक महत्त्वाचे ठरते. मान्सून वेळेवर येणे, त्याची सातत्यपूर्ण प्रगती आणि शेवटच्या टप्प्यातील पाऊस यावर खरीप हंगामाचे यश अवलंबून असते. हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस दुसरा सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. या अंदाजामध्ये विविध भागांतील पावसाचे वितरण अधिक स्पष्टपणे मांडले जाणार असून, त्यावरून शेती व जलव्यवस्थापनाचे नियोजन अधिक नेमकेपणाने करता येणार आहे.
पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी
अपुरा पाऊस : सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी
सरासरीपेक्षा कमी : 90 ते 95 टक्के
सामान्य पाऊस : 96 ते 104 टक्के
सरासरीपेक्षा अधिक : 105 ते 110 टक्के
अत्यधिक पाऊस : 110 टक्क्यांपेक्षा जास्त

COMMENTS