मुंबई : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट 2026’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषण

मुंबई : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘माय युवा भारत’द्वारे ‘माय भारत बजेट क्वेस्ट 2026’ मुंबई झोनच्या अंतिम फेरीची घोषणा करण्यात आली आहे. या झोनमध्ये महाराष्ट्र, गोवा आणि पुदुच्चेरीचा समावेश आहे. ही दोन दिवसीय अंतिम फेरी 12 व 13 एप्रिल 2026 दरम्यान नवी मुंबईतील नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ येथे होणार असल्याची माहिती माय युवा भारत महाराष्ट्र व गोवा चे राज्य संचालक अमित पुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी माय युवा भारत मुंबई चे उपसंचालक अनुप इंगोले उपस्थित होते.
अमित पुंडे यांनी सांगितले की, या महत्त्वपूर्ण कार्यक्रमात देशभरातून राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले उत्कृष्ट युवा सहभागी एकत्र येणार आहेत. दोन दिवसीय विचारमंथन सत्रात शिक्षणतज्ज्ञ, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विषयविशेषज्ज्ञ सहभागी होऊन केंद्रीय अर्थसंकल्प 2026 शी निगडित विषयांवर चर्चा करतील. देशभरातील 17 ठिकाणांहून 15,000 हून अधिक युवक या संवादात सहभागी होणार आहेत. देशभरातून 12 लाखांहून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला असून 46,500 पेक्षा अधिक निबंध प्राप्त झाले आहेत. मुंबईतील अंतिम फेरीत सहभागी युवक विकसित कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकरी कल्याण बळकटीकरण तसेच मानवी संसाधन शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार या विषयांवर चर्चा पुढे नेतील. 12 एप्रिल रोजी सहभागींचे आगमन व नोंदणी होईल आणि दुपारी महिला युवा संसद आयोजित केली जाईल. 13 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ, माय भारत सत्र आणि दोन तज्ज्ञ पॅनल चर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘नारी शक्तीः विकसित भारत की आवाज’ या विषयावर आधारित महिला युवा संसद हा कार्यक्रमाचा विशेष भाग असेल. या सत्रात महिला सहभागी महिला आरक्षण विधेयकावर संसदीय पद्धतीने चर्चा करतील. पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी 12 एप्रिलच्या सायंकाळी भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने ‘संडे ऑन सायकल’ हा उपक्रम नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम येथे आयोजित करण्यात येणार आहे. 13 एप्रिल 2026 रोजी निवडलेल्या 911 सहभागींचा केंद्रीय अर्थसंकल्पातील विविध क्षेत्रांवर सखोल संवाद होईल. राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरील गुणवंत विद्यार्थ्यांसह हा संवाद होणार आहे. 2 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. माय भारत बजेट क्वेस्ट 2026 हा उपक्रम केंद्रीय अर्थसंकल्प 2026 आणि युवकांच्या आकांक्षा यांना जोडणारा एक परिवर्तनशील मंच ठरला आहे.

COMMENTS