नांदेड : कॅनॉल रोडवरील डी-मार्ट परिसरात घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडाने आता केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर थेट राजकारणाचेही कुरूप चेहरे उघडे पाडाय

नांदेड : कॅनॉल रोडवरील डी-मार्ट परिसरात घडलेल्या थरारक तिहेरी हत्याकांडाने आता केवळ गुन्हेगारीच नव्हे, तर थेट राजकारणाचेही कुरूप चेहरे उघडे पाडायला सुरुवात केली आहे. रक्तरंजित गँगवारमधील फरार आरोपींचे धागेदोरे थेट एका एमआयएम नगरसेवकापर्यंत पोहोचत असल्याच्या संशयाने पोलिसांनी चौकशीची मोहीम तीव्र केली असून, यामुळे शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वर्चस्वाच्या वादातून पेटलेल्या या गँगवारमध्ये तिघांचा निर्घृण खून झाला. शहर हादरले, नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले; मात्र या घटनेचे पडसाद आता अधिक गंभीर पातळीवर उमटत आहेत. काही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले असले तरी, मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहेत-आणि याच फरार गुन्हेगारांच्या ‘राजकीय लिंक’चा संशय तपासाला नवे वळण देत आहे. देगलूर नाका परिसरातील एका एमआयएम नगरसेवकाच्या संपर्कात हे फरार आरोपी असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते. या आरोपींना आश्रय देण्यात आला का? त्यांच्या हालचालींबाबत नगरसेवकाला माहिती होती का? की यामागे आणखी मोठे राजकीय संरक्षण आहे?-असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने संबंधित नगरसेवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नगरसेवकावर कारवाई होताच एमआयएमच्या पदाधिकार्यांनी तत्काळ एसपी कार्यालयावर धाव घेतली. विनाकारण अडकवले जात आहे असा दावा करत त्यांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र स्पष्ट दिसले. एका बाजूला तिहेरी खूनाचा तपास आणि दुसर्या बाजूला राजकीय हस्तक्षेप-यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
पोलीस ठाम-‘दबावाला बळी पडणार नाही’
पोलिसांनी मात्र स्पष्ट भूमिका घेतली आहे. तपास हा निष्पक्ष आणि पुराव्यांवर आधारित असेल. कोणताही राजकीय दबाव आम्ही मान्य करणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस सूत्रांनी दिला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तांत्रिक साधने, गुप्त माहिती आणि स्थानिक नेटवर्क यांचा पूर्ण क्षमतेने वापर सुरू असल्याचेही सांगण्यात आले.
गुन्हेगारीला राजकीय पाठबळ? शहरात संतापाची लाट
या संपूर्ण प्रकरणामुळे एक गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे-गुन्हेगारीला राजकीय संरक्षण मिळते आहे का? नांदेडसारख्या शहरात उघडपणे गँगवार, खून आणि त्यानंतर राजकीय बचावाचे प्रयत्न हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. तिहेरी हत्याकांडाचा तपास आता निर्णायक टप्प्यात आहे. पुढील काही दिवसांत या ‘राजकीय कनेक्शन’चे खरे स्वरूप समोर येणार का, की पुन्हा एकदा सत्यावर पडदा टाकला जाणार?-याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


COMMENTS