Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्याला दिल्लीत अटक

नवी दिल्ली : देशविघातक कारवायांना आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मोठे यश मिळाले असून, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी

एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!
छुप्या परिसीमनवर सरकार-विरोधक खडाजंगी !
काँगे्रस नेते पवन खेरा यांना ‘सर्वोच्च’ धक्का; सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामिनाला स्थगिती

नवी दिल्ली : देशविघातक कारवायांना आळा घालण्यासाठी कार्यरत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला मोठे यश मिळाले असून, लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित शब्बीर अहमद लोन याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली सीमेवर गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यात ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, शब्बीर अहमद लोन हा पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेच्या सूचनांनुसार भारतात दहशतवादी जाळे पुन्हा सक्रिय करण्याच्या प्रयत्नात होता. विशेष पथकाने त्याच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवत योग्य वेळी सापळा रचला आणि त्याला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे संभाव्य मोठा धोका टळल्याचे सुरक्षा यंत्रणांचे मत आहे. प्राथमिक चौकशीत लोनच्या भारतातील संपर्कांचे धागेदोरे उलगडू लागले असून, त्याच्या नेटवर्कमध्ये आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा शोध सुरू आहे. त्याने देशातील विविध भागांत नवीन मॉड्यूल उभारण्याचा प्रयत्न केल्याचे संकेत मिळत आहेत. विशेषतः राजधानीसह काही प्रमुख शहरांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात देशातील काही शहरांमध्ये भारतविरोधी प्रचाराचे प्रकार उघडकीस आले होते. सार्वजनिक ठिकाणी भडकावू पोस्टर्स लावून वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनांमागे संघटित जाळे कार्यरत असल्याचे तपासात समोर आले होते. त्या पार्श्‍वभूमीवर ही अटक महत्त्वाची मानली जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, या जाळ्याचे धागेदोरे परदेशातून हलवले जात होते. विशेषतः सीमापार बसून देशांतर्गत कारवायांचे नियोजन केले जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. शब्बीर अहमद लोन हा अशा कारवायांचा समन्वयक म्हणून कार्यरत होता, अशी शक्यता तपासात व्यक्त होत आहे. सध्या त्याची सखोल चौकशी सुरू असून, त्याच्याकडून मिळणार्‍या माहितीद्वारे आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्या संपर्कातील इतर संशयितांवर देखील लक्ष ठेवण्यात आले असून, लवकरच आणखी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS