लोहा : लोहा येथे रविवारी पार पडलेली शिवसेनेची सभा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या शिवसेनेतील पक्

लोहा : लोहा येथे रविवारी पार पडलेली शिवसेनेची सभा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशानिमित्त आयोजित या सभेला अपेक्षित प्रतिसाद मिळवण्यासाठी आयोजकांनी अक्षरशः कसरत केल्याचे बोलले जात आहे. मात्र एवढे प्रयत्न करूनही सभेचे ‘शक्तीप्रदर्शन’ हे ‘शक्ती-परीक्षण’ ठरले आणि निकाल फारसा समाधानकारक लागला नसल्याची चर्चा रंगली आहे.
सभेसाठी खेडोपाड्यातील नागरिकांना 300 ते 400 रुपये देऊन बोलावण्यात आल्याची चर्चा सभास्थळी ऐकायला मिळाली. रोजंदारीवर काम करणार्या अनेकांना आज शेती नको, सभा करा असा जणू संदेशच देण्यात आला होता. काहींनी तर हसत-हसत सांगितले, कामाला गेलो असतो तर एवढे मिळाले नसते, सभा तरी फायद्याची ठरली! लोकांना आणण्यासाठी गाड्यांची मोठ्या प्रमाणावर व्यवस्था करण्यात आली होती. ट्रॅक्टरपासून ते जीपपर्यंत सर्व साधनांचा वापर करून गर्दी जमवण्याचा प्रयत्न झाला. पण एवढे सगळे ‘लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट’ करूनही चार-पाच हजारांपुढे आकडा गेला नाही, अशी चर्चा आहे. त्यामुळे गाडी भरली, पण मैदान नाही भरलं! अशी उपरोधिक प्रतिक्रिया काहींच्या तोंडी ऐकायला मिळाली. सभेतील आणखी एक चर्चेचा मुद्दा म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा तब्बल दोन तास उशिरा झालेला आगमन. आधीच उन्हाचा तडाखा आणि त्यात नेत्यांची वाट पाहत बसलेली जनता त्यामुळे अनेकांचा संयम सुटला. नेते येईपर्यंत आम्हीच निवडणूक लढवून आलो असतो! असा टोमणा काही जणांनी मारल्याचे सांगितले जाते. उशीरामुळे सभेतील निम्मी गर्दी कंटाळून निघून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. सुरुवातीला भरलेले मैदान हळूहळू रिकामे होत गेले आणि शेवटी मागील हजारो खुर्च्या रिकाम्या दिसू लागल्या. आयोजकांनी लावलेल्या खुर्च्यांनाही जणू प्रश्न पडला होता आम्हाला बसायला कोणी येणार का? सभेचा एकूणच माहोल पाहता ही सभा होती की ट्रायल शो? असा सवाल उपस्थित केला जात आहे. धोंडगे कुटुंबीयांनी केलेले शक्तीप्रदर्शन अपेक्षेप्रमाणे रंगले नाही, उलट त्याचा फज्जा उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे गर्दी जमवणे आणि जनसमर्थन मिळवणे यात जमीन-अस्मानाचा फरक असतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पैशाने माणसं येऊ शकतात, पण मनं जिंकण्यासाठी वेगळाच करिष्मा लागतो, हे लोह्याच्या सभेने दाखवून दिल्याचे बोलले जात आहे. एकूणच, लोहाची ही सभा राजकारणातील ‘व्यवस्थापन’ आणि ‘वास्तव’ यातील फरक दाखवणारी ठरली. आता पुढे तरी नेतेमंडळींनी खुर्च्या भरण्यापेक्षा मनं भरण्यावर भर द्यावा, अशी टोमणेबाज अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील आमदार एकत्र आले असले तरी त्यांची तोंडे मात्र विरुद्ध दिशेला आहेत त्यामुळे धोंडगे बंधूंना लोहा कंधार तालुक्यात शिवसेनेचा कितपत फायदा होईल व राजकीय गणिते जुळतील का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS