किनवट : किनवटच्या निसर्गसौंदर्याचा मानबिंदू असलेला अंबाडी घाट बुधवारी सायंकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सायंकाळी च्या सुमारास लागलेल्या या भीषण

किनवट : किनवटच्या निसर्गसौंदर्याचा मानबिंदू असलेला अंबाडी घाट बुधवारी सायंकाळी आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सायंकाळी च्या सुमारास लागलेल्या या भीषण वणव्याने काही वेळातच रौद्र रूप धारण केले, ज्यामध्ये केवळ झाडेच नव्हे तर या भूमीचे वैभव असलेल्या दुर्मिळ वनौषधी, कीटक आणि सरपटणार्या प्राण्यांचा जळून कोळसा झाला आहे.
बुधवारी सूर्यास्त होत असतानाच अंबाडी घाटातून धुराचे लोट आकाशाकडे झेपावू लागले. वाळलेला पालापाचोळा आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने जंगलाला विळखा घातला. बघता बघता हिरवेगार जंगल ’अग्नीकुंड’ बनले. या आगीत जमिनीवर वावरणारे छोटे जीव आणि अनेक दुर्मिळ वनस्पती क्षणात भस्मसात झाल्या. निसर्गाचे हे अपरिमित नुकसान पाहून पर्यावरणप्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. अंबाडी घाट हा जैवविविधतेचा खजिना मानला जातो. मात्र, या वणव्यामुळे वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाले आहेत. जीवाच्या आकांताने सैरावैरा धावणारे वन्यप्राणी आता मानवी वस्तीकडे वळण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. या घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. वन विकास महामंडळाने ’विरळीकरणाच्या’ नावाखाली घनदाट जंगलाचे रूपांतर वाळवंटात केल्याचा गंभीर आरोप होत आहे. जंगल तोडा आणि पगारी करा असाच जणू नारा महामंडळ राबवत असल्याचा टोला सामाजिक कार्यकर्त्यांनी लगावला आहे. हे जंगल महामंडळाकडून काढून पुन्हा ’प्रादेशिक वनविभागा’कडे वर्ग करण्याची मागणी वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. हा वणवा नैसर्गिक आहे की मानवनिर्मित? दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावरच असे का घडते? वन विकास महामंडळ यावर कायमस्वरूपी उपाययोजना का करत नाही? असे टोकदार प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.

COMMENTS