Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पार्थ पवारांवर गुन्हा नोंदवा : अंजली दमानिया

मुंबई : पुण्यातील मुंढवा परिसरातील बहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरण नव्या टप्प्यात पोहोचले असून, समितीच्या अहवालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे

राज्यात इंधनसाठा मुबलक; पेट्रोल व एलपीजी सुरळीत; अफवांपासून दूर राहण्याचे अन्न नागरी पुरवठा विभागाचे आवाहन
इंदापूर साखर कारखान्यात 185 कोटींचा एफआरपी घोटाळा; शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल राजे पवार यांचा गंभीर आरोप
व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्यामुलाच्या लग्नात प्रफुल्ल पटेलांची उपस्थिती ?

मुंबई : पुण्यातील मुंढवा परिसरातील बहुचर्चित जमीन व्यवहार प्रकरण नव्या टप्प्यात पोहोचले असून, समितीच्या अहवालानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाईची मागणी जोर धरत असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट पार्थ पवार यांच्यावर गुन्हा नोंदवून जबाबदारी निश्‍चित करण्याची मागणी केली आहे.
समितीच्या अहवालात काही भागीदारांच्या भूमिकेबाबत गंभीर निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. या पार्श्‍वभूमीवर दमानिया यांनी सांगितले की, अहवालात उल्लेखलेल्या इतर भागीदार या संज्ञेत पार्थ पवार यांचाही समावेश होतो. व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांवरून त्यांना अधिकार देण्यात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचा दावा त्यांनी पुन्हा अधोरेखित केला. दमानिया यांनी स्पष्ट केले की, समितीने या प्रकरणाला फौजदारी स्वरूपाचे मानले असून, पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे अहवाल पाठवण्यात येणार आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी असल्याने त्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने गुन्हा नोंदवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली. दमानिया यांनी ठामपणे सांगितले की, या प्रकरणात कोणालाही सहजपणे निर्दोष ठरवता येणार नाही. एका कंपनीतील अल्प हिस्सा असलेल्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवला जात असेल, तर मोठा सहभाग असलेल्या व्यक्तींनाही जबाबदारीतून सूट देता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले. व्यवहारात गंभीर अनियमितता झाल्याचे अहवालातील निरीक्षणे सूचित करतात, असेही त्यांनी जोडले. या प्रकरणातून शासकीय जमिनींच्या वापरावरही प्रश्‍न उपस्थित होत आहेत. दमानिया यांनी सहा महिन्यांच्या आत सर्व शासकीय जमिनींची तपासणी करून त्याचा सविस्तर अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी केली. राजकीय दबावाखाली शासकीय मालमत्ता खासगी हितासाठी वापरली जाणार असेल, तर ते मान्य केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, दुसर्‍या एका प्रकरणाचा संदर्भ देत दमानिया यांनी पीडित महिलांची ओळख उघड होईल असे कोणतेही साहित्य प्रसारित करू नये, असे आवाहन केले. संबंधित तपास प्रक्रियेत सहकार्य करणार्‍यांना अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणांनी संवेदनशीलतेने वागावे, असे त्यांनी नमूद केले.

COMMENTS