मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि शेतकर्यांच्या वाढत्या अडचणींचा प्रश्न मांडत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारवर जोरद

मुंबई : राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि शेतकर्यांच्या वाढत्या अडचणींचा प्रश्न मांडत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सरकारवर जोरदार टीका केली. अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकर्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी करतानाच चंद्रपूर जिल्ह्यातील बेपत्ता मुलींच्या प्रकरणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असा ठाम आग्रह त्यांनी धरला.
मराठवाड्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये हजारो हेक्टरवरील पिके बाधित झाली असून अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत, तर काही नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. तरीही नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची टीका त्यांनी केली. अनेक भागांत पंचनामेही पूर्ण झालेले नसल्याचे सांगत सरकारने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. शेतकरी संकटात असताना केवळ आश्वासनांवर समाधान मानता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, हाफकिन संस्थेकडील लसीसाठी वापरल्या जाणार्या महत्त्वाच्या जैव-संपत्तीच्या हस्तांतरणाच्या प्रस्तावावरही वडेट्टीवार यांनी आक्षेप नोंदवला. ही संपत्ती खाजगी क्षेत्राकडे देण्याचा विचार सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी घातक ठरू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. हाफकिन संस्थेला सक्षम करून स्वस्त दरात लस उत्पादन वाढविण्यावर भर द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. एकूणच, शेतकरी, महिला सुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य या तिन्ही महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी करत वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
सहा अल्पवयीन बेपत्ता मुलींचा शोध घ्या
विधानसभेत वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून बोलताना राज्यातील सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारला धारेवर धरले. ब्रह्मपुरी परिसरात गेल्या काही दिवसांत दहावी व बारावीतील सहा अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. यापैकी केवळ दोन मुलींचा शोध लागला असून उर्वरित चार मुली अद्याप सापडलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले. सरकारकडून सीसीटीव्ही यंत्रणांवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो, मात्र ग्रामीण व तालुका स्तरावर या सुविधा अपुर्या का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याची गरज अधोरेखित करत या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी त्यांनी केली.


COMMENTS