पुणे : बारामतीसह राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एकमताचा अभाव स्पष्टपणे समोर येत आहे. विशेषतः बारामती मतदारसंघात उमेदवा

पुणे : बारामतीसह राज्यातील पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत एकमताचा अभाव स्पष्टपणे समोर येत आहे. विशेषतः बारामती मतदारसंघात उमेदवारीवरून निर्माण झालेला तणाव आता उघड पातळीवर आला असून, काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट संकेत दिले की, जर शरद पवार गटाने या निवडणुकीत उमेदवार दिला नाही, तर काँग्रेस स्वतःचा उमेदवार उभा करू शकते. बारामती पोटनिवडणुकीबाबत सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या ‘न लढण्याच्या’ भूमिकेशी काँग्रेस सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या संदर्भात आघाडीत अद्याप अधिकृत चर्चा झालेली नसून, सर्व पक्षांमध्ये संवाद झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी नमूद केले. बारामतीतील काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्यांनीही स्पष्ट इशारा दिला आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवार न दिल्यास काँग्रेस मैदानात उतरेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीमुळे काँग्रेसची वाढ खुंटली, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. याशिवाय, पूर्वीच्या आघाड्यांमध्ये राष्ट्रवादीने काँग्रेसला अडचणीत टाकल्याचा आरोपही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणूक लढवणे गरजेचे’ असल्याचा मुद्दा पुढे केला आहे. या पोटनिवडणुकीची घोषणा झालेली असून 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे बारामतीत होणारी लढत अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. दुसरीकडे, सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका पुन्हा स्पष्ट करत, बारामतीतून निवडणूक न लढण्याचा निर्णय कायम असल्याचे सांगितले. सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले. त्यांनी महाविकास आघाडी देखील या पोटनिवडणुकीत उमेदवार देणार नाही, असे सूचित केले आहे. मात्र काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे बारामतीतील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. आघाडीतील मतभेद उघडपणे समोर येत असून, पुढील काही दिवसांत या प्रश्नावर कोणता तोडगा निघतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS