Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मायेपुढे मृत्यूही हरतो ! आगीच्या ज्वाळांतून नातींना वाचवणारी ‘आजी’राहुरीत घराला भीषण आग ; संसारोपयोगी साहित्य जाळून खाक; महिला जखमी

देवळाली प्रवरा : नाती-नातवांवर आजीचे प्रेम हे केवळ भावना नसून त्यामागे असते निस्सीम माया आणि त्यागाची ताकद… याचे जिवंत उदाहरण राहुरीत पाहाय

अनिल पावटे यांना उत्कृष्ट अध्यापन व साहित्य सेवा पुरस्कार
बदलापूर घटनेचा राहुरीतील मुस्लिम महिलांकडून निषेध
नियमित पिक कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना अनुदान द्या – आ. आशुतोष काळे

देवळाली प्रवरा : नाती-नातवांवर आजीचे प्रेम हे केवळ भावना नसून त्यामागे असते निस्सीम माया आणि त्यागाची ताकद… याचे जिवंत उदाहरण राहुरीत पाहायला मिळाले. स्वतःचा जीव धोक्यात घालून नातींचे प्राण वाचवणाऱ्या एका आजीने मायेचे खरे रूपच सर्वांसमोर उभे केले.

राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातील करपे इस्टेट येथे मंगळवार, दि. १७ मार्च रोजी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास नितीन कोरडे यांच्या घराला अचानक भीषण आग लागली. घरात दोन लहान मुली अडकल्या होत्या. घरात अन्य कोणीही नसल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती.

याचवेळी बाहेर गेलेल्या मुलींच्या आजी मनीषा कोरडे या घरी परतल्या. घरातून उसळणाऱ्या आगीच्या ज्वाळा आणि नातींचा आर्त आरडाओरडा पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता थेट आगीत धाव घेतली. जीवाची पर्वा न करता त्यांनी धाडसाने दोन्ही नातींना सुरक्षित बाहेर काढले. मात्र या शौर्यपूर्ण प्रयत्नात त्या स्वतः गंभीर भाजून जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आजींना रुग्णालयात दाखल केले तसेच आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. आगीत घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या घटनेनंतर माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, दिलीप गोसावी, अक्षय गोपाळे, बाळासाहेब वराळे, गणेश आघाव, अक्षय कडू, अश्विन फुलसौंदर, लखन चव्हाण, मिलिंद हरिश्चंद्रे यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी मदतकार्य केले.प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

 या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले की, नात्यांची खरी ताकद ही मायेच्या बळावरच उभी असते. स्वतःच्या वेदना विसरून नातींचे प्राण वाचवणाऱ्या या धाडसी आजीच्या साहसाचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना सर्वजण करत आहेत.

COMMENTS