Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

होर्मुझ सामुद्रधुनीतील भारतीय जहाजे सुरक्षित; युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय जहाजांबाबत निर्माण झालेली चिंता केंद्र सरकारने दूर क

रस्त्यावर गॅस सिलेंडर वितरणाला पूर्णविराम; भानेश्वर गॅस एजन्सीचा निर्णय; आता ग्राहकांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच होणार वितरण
तृतीयपंथीयांकडून यल्लमादेवीचा भक्तिमय जागर; जगातील युद्धसंकट दूर करण्यासाठी देवीचरणी प्रार्थना
महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे : डॉ. प्रतिभा पाचपुते


नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेल्या भारतीय जहाजांबाबत निर्माण झालेली चिंता केंद्र सरकारने दूर केली आहे. एकूण 22 भारतीय जहाजे सध्या त्या भागात अडकलेली असली, तरी ती पूर्णपणे सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांत काही माध्यमांतून अशी चर्चा रंगली होती की इराणकडून भारतीय ध्वजधारी किंवा भारताकडे येणार्‍या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. मात्र, केंद्राने या सर्व दाव्यांचे ठामपणे खंडन केले असून अशा कोणत्याही प्रकारची मागणी झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारकडून असेही सांगण्यात आले की, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. अडकलेल्या जहाजांना सुरक्षितपणे मार्ग मिळावा यासाठी इराणसह संबंधित देशांशी संवाद साधण्याची प्रक्रिया सुरू आहे. परराष्ट्र स्तरावर आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येत असल्याचा विश्‍वासही व्यक्त करण्यात आला. काही जहाजांवर पूर्वीपासूनच नियमभंग आणि बेकायदेशीर मालवाहतुकीचे आरोप असल्याचेही समोर आले आहे. भारतीय तटरक्षक दलाने यासंदर्भात तक्रार नोंदवली असून, काही जहाजांनी आपली ओळख लपवणे किंवा समुद्रात एकमेकांदरम्यान मालाची अदलाबदल करणे अशा संशयास्पद हालचाली केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारसमोर दुहेरी आव्हान उभे आहे. एकीकडे जहाजे आणि त्यावरील कर्मचार्‍यांची सुरक्षितता सुनिश्‍चित करणे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन आणि सागरी सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकरणात संयम, पारदर्शकता आणि प्रभावी कूटनीती यांचा समतोल राखणे अत्यावश्यक ठरणार आहे.
दरम्यान सौदी अरेबियातील यानबू बंदरातून तेलवाहू जहाजे भारताच्या दिशेने रवाना झाली असून, सध्या चार मोठ्या टँकरमधून सुमारे 60 लाख बॅरल कच्चे तेल भारताकडे येत आहे. याशिवाय, चालू महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी 90 लाख ते एक कोटी बॅरल तेल भारतात पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर भारताचा ऊर्जा पुरवठा काही प्रमाणात स्थिर राहण्यास मदत होणार आहे. जागतिक तेल व्यापारात होर्मुज सामुद्रधुनीचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेलवाहतूक या मार्गाने केली जाते.

भारताला सौदी अरेबियाकडून कच्च्या तेलाचा पुरवठा
पश्‍चिम आशियातील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढत असताना भारतासाठी काहीसा दिलासादायक घडामोडी घडत आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे होर्मुज सामुद्रधुनी परिसरात अस्थिरता वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर सौदी अरेबियाने भारतासाठी कच्च्या तेलाच्या पुरवठ्याचा पर्यायी मार्ग स्वीकारत रेड सी मार्गे तेल पाठवण्यास सुरुवात केली आहे.


भारतासाठी तात्पुरता दिलासा
अमेरिकेनेही सक्रिय भूमिका घेतली असून, होर्मुझ परिसरात इराणच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्र तळांवर हवाई कारवाई केली आहे. या कारवाईमागे त्या भागातील इराणचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. एकूणच, सौदी अरेबियाकडून सुरू झालेला पर्यायी तेलपुरवठा भारतासाठी तात्पुरता दिलासा देणारा ठरत असला, तरी जागतिक राजकीय तणाव आणि समुद्री सुरक्षेचे आव्हान कायम असल्यामुळे ऊर्जा सुरक्षिततेसाठी दीर्घकालीन धोरणांची गरज अधिक प्रकर्षाने पुढे येत आहे.

COMMENTS