समाजातील वाढती विकृती…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समाजातील वाढती विकृती…

समाजाच्या प्रगतीची गाथा आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. यामध्ये आपण झपाट्याने पुढे जात आहोत, अशी छातीठोकपणे घोषणा करतो. मात्र, या प्रगतीच्या पायावर

राखीव खाटा न दिल्याने ग्लोबल रुग्णालयावर कारवाई ; अतिरिक्त एफएसआय सवलत रद्द करणार : राज्यमंत्री माधुरी मिसाळ
सर्वसामान्यांचे जगणे झाले महाग !
राज्यात 75 हजार पदांची नवी भरती
The current image has no alternative text. The file name is: image-2.jpeg


समाजाच्या प्रगतीची गाथा आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. यामध्ये आपण झपाट्याने पुढे जात आहोत, अशी छातीठोकपणे घोषणा करतो. मात्र, या प्रगतीच्या पायावर जर मानवी संवेदनाच कोलमडत असतील, तर ती प्रगती केवळ भास ठरते. संगमनेरमधील एका 12 वर्षांच्या शाळकरी मुलीवर झालेला सिड हल्ला आणि नाशिकमधील बलात्कार प्रकरणातील धक्कादायक व्हिडिओकांड-या दोन घटना समाजातील वाढत्या विकृततेचे उघडे, भयावह आणि अस्वस्थ करणारे चित्र आपल्या समोर उभे करतात.
एका बाजूला शाळा सुटून सायकलवरून घरी जाणारी निष्पाप मुलगी. तिच्या मनात ना कुठला संशय, ना भीती. आणि दुसर्‍या बाजूला तिच्यावर सिड फेकणारा एक अज्ञात विकृत. हा हल्ला केवळ एका मुलीवर झालेला गुन्हा नाही; तो संपूर्ण समाजाच्या विवेकबुद्धीवर झालेला हल्ला आहे. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये क्रौर्याची जी पातळी दिसते, ती माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेत सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोराची मानसिकता. एका 12 वर्षांच्या मुलीवर सिड फेकण्याइतकी निर्दयता त्याच्या मनात कशी निर्माण झाली? हा प्रश्‍न केवळ त्या एका व्यक्तीपुरता मर्यादित नाही. तो आपल्या समाजाच्या सामूहिक मानसिकतेवर बोट ठेवतो. हिंसा, सूड, स्त्रीद्वेष आणि विकृत आनंद-या सगळ्या भावना इतक्या खोलवर रुजल्या आहेत की त्या आता कृतीतून बाहेर पडू लागल्या आहेत. दुसरीकडे, नाशिकमध्ये उघडकीस आलेले प्रकरण आणखी भयावह आहे. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीकडून तब्बल 58 व्हिडिओ जप्त होणे ही बाब केवळ गुन्हेगारी नसून विकृतीची पराकाष्ठा दर्शवते. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच, ही विकृती आता समाजाच्या तळागाळापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती उच्चभ्रू स्तरापर्यंत पोहोचली आहे.
या दोन घटनांचा एकत्रित विचार केला, तर एक गोष्ट स्पष्ट होते-आपण केवळ गुन्हेगारांना दोष देऊन मोकळे होऊ शकत नाही. कारण हे गुन्हेगार अचानक निर्माण होत नाहीत. ते याच समाजातून घडतात, वाढतात आणि शेवटी अशा भयावह कृत्यांना अंजाम देतात. राजकीय स्तरावरही या घटनांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केलेला प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा आहे-राज्यात पोलिसांचा धाक उरला आहे का? हा प्रश्‍न केवळ सरकारला उद्देशून नाही; तो संपूर्ण व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा आहे. जेव्हा गुन्हेगारांना कायद्याची भीती राहत नाही, तेव्हा ते अधिक निर्भय होतात. आणि जेव्हा रक्षकच निष्क्रिय किंवा भ्रष्ट होतात, तेव्हा समाजात अराजकतेचे वातावरण निर्माण होते.
पोलिस यंत्रणेवर होणारे आरोप आणि तिची कार्यक्षमता हा मुद्दा नक्कीच गंभीर आहे. मात्र, त्याचबरोबर समाजातील मूल्यव्यवस्थेचा र्‍हास हा देखील तितकाच महत्त्वाचा घटक आहे. आजच्या काळात मुलांवर होणारा संस्कारांचा अभाव, माध्यमांमधून पसरत असलेली हिंसात्मक आणि अश्‍लील सामग्री, सोशल मीडियावरची अनियंत्रित अभिव्यक्ती-या सगळ्यांचा परिणाम म्हणून एक विकृत मानसिकता तयार होत आहे. विशेषतः स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मोठा प्रश्‍न बनला आहे. स्त्री ही व्यक्ती म्हणून नव्हे, तर वस्तू म्हणून पाहण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. यामुळेच अशा प्रकारचे अत्याचार घडतात. सिड हल्ला असो किंवा बलात्कार-या दोन्ही गुन्ह्यांच्या मुळाशी स्त्रीद्वेष आणि वर्चस्ववादी मानसिकता आहे. यामध्ये शिक्षणव्यवस्थेची भूमिका देखील तपासण्याची गरज आहे. आपण विद्यार्थ्यांना केवळ गुण, करिअर आणि स्पर्धा यांमध्ये अडकवून ठेवले आहे. नैतिक मूल्ये, सहानुभूती, स्त्री-पुरुष समानता यासारख्या मूलभूत गोष्टींचा अभाव जाणवतो. परिणामी, बुद्धिमत्ता वाढते, पण संवेदनशीलता हरवते. अनेकदा गुन्ह्यांच्या मुळाशी असलेल्या कारणांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे समाजात भीती तर निर्माण होते, पण उपाययोजना मात्र होत नाहीत. सरकारची जबाबदारी नक्कीच मोठी आहे. कठोर कायदे, जलद न्यायप्रक्रिया आणि सक्षम पोलिस व्यवस्था ही गरजेची आहे. पण त्याचबरोबर समाजातील प्रत्येक घटकाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पालकांनी मुलांवर योग्य संस्कार करणे, शाळांनी मूल्याधारित शिक्षण देणे आणि समाजाने चुकीच्या गोष्टींना थारा न देणे-ही सगळी सामूहिक जबाबदारी आहे. आज परिस्थिती अशी आहे की, पालक आपल्या मुलींना सुरक्षिततेच्या नावाखाली बंधनात ठेवू लागले आहेत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. कारण समस्या मुलींमध्ये नाही, तर मुलांच्या आणि समाजाच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे उपायही तिथेच शोधला पाहिजे. या पार्श्‍वभूमीवर, काही ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. प्रथम, सिड विक्रीवर कडक निर्बंध आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे. दुसरे म्हणजे, लैंगिक गुन्ह्यांवरील प्रकरणांची जलदगतीने सुनावणी होऊन दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. तिसरे म्हणजे, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लैंगिक शिक्षण आणि नैतिक शिक्षण अनिवार्य केले पाहिजे. परंतु, या सर्व उपायांपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिकतेत बदल. जोपर्यंत आपण स्त्रियांकडे समानतेने पाहायला शिकत नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत. समाजातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आज गरज आहे ती केवळ संताप व्यक्त करण्याची नाही, तर कृती करण्याची. प्रत्येक अशा घटनेनंतर आपण काही दिवस चर्चा करतो, आंदोलन करतो आणि नंतर सर्व काही विसरून जातो. हीच निष्क्रियता गुन्हेगारांना बळ देते. संगमनेरमधील त्या निष्पाप मुलीचा चेहरा आणि नाशिकमधील त्या भयावह व्हिडिओंचा विचार केला, तर एकच प्रश्‍न मनात येतो-आपण नेमके कुठे चाललो आहोत? जर या प्रश्‍नाचे उत्तर आपण प्रामाणिकपणे शोधले नाही, तर उद्याचा समाज आणखी भयावह असणार आहे. समाजाची खरी प्रगती ही इमारती, रस्ते किंवा तंत्रज्ञानाने होत नाही; ती माणसांच्या विचारांनी आणि वर्तनाने होते. आणि आज जर तेच विकृत होत असतील, तर ही केवळ चिंता नाही-तर धोक्याची घंटा आहे.

COMMENTS