अहिल्यानगर : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली असून मतदारसंघाच्या हद्दीत तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंह

अहिल्यानगर : राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा भारत निवडणूक आयोगाने केली असून मतदारसंघाच्या हद्दीत तात्काळ प्रभावाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी वर्षा पवार, तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूर आदी उपस्थित होते.
डॉ. आशिया यांनी सांगितले की, या पोटनिवडणुकीची अधिसूचना 30 मार्च रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 6 एप्रिल असेल. 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होईल, तर 9 एप्रिलपर्यंत उमेदवारी मागे घेता येणार आहे. मतदान 23 एप्रिल रोजी पार पडेल आणि 4 मे रोजी मतमोजणी केली जाईल. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मेपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा पुनर्वसन अधिकारी वर्षा पवार यांची नियुक्ती करण्यात आली असून सहायक निर्णय अधिकारी म्हणून राहुरीचे तहसीलदार अमित पवार काम पाहणार आहेत. नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यासाठी राहुरी तहसील कार्यालय परिसरातील जुने सेतू कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. मतमोजणी लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राहुरी येथे केली जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी पाच हजार रुपये ठेवण्यात आली आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा चाळीस लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेसाठी 598 बॅलेट युनिट, 614 नियंत्रण युनिट आणि 606 मतदार पडताळणी यंत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व यंत्रांची प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण झाली असून मतदारांना मतदानाची खात्री मिळावी यासाठी प्रत्येक यंत्रासोबत पडताळणी यंत्र जोडण्यात येणार आहे. नागरिकांच्या तक्रारींसाठी जिल्हा संपर्क केंद्रात 1950 हा टोलमुक्त दूरध्वनी क्रमांक सुरू करण्यात आला असून तो निवडणूक कालावधीत चोवीस तास उपलब्ध राहील. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास मोबाईलवरील सी-व्हिजील या अनुप्रयोगाद्वारे तक्रार नोंदविता येणार आहे. 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले मतदार तसेच संसर्गजन्य आजाराने बाधित मतदारांना घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवांतील कर्मचार्यांसाठी टपाली मतपत्रिकेचीही सोय करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर पाच कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी नियुक्त केला जाणार आहे.
3 लाख 33 हजार मतदार 374 मतदान केंद्रावर करणार मतदान
मतदारसंघात एकूण 374 मतदान केंद्रे असून 15 मार्च 2026 रोजीच्या मतदार यादीनुसार एकूण 3 लाख 33 हजार 183 मतदार नोंद आहेत. त्यामध्ये 1 लाख 72 हजार 85 पुरुष, 1 लाख 61 हजार 97 महिला आणि 1 इतर मतदार आहे. तसेच 1 हजार 52 सैनिक मतदारांची नोंद आहे.

COMMENTS