पाथर्डी : तालुक्यातील सुसरे गावात दलित वस्ती योजनेतील शिल्लक निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामसेवकाने एकाच व्यक्तीच्या न

पाथर्डी : तालुक्यातील सुसरे गावात दलित वस्ती योजनेतील शिल्लक निधीचा गैरवापर झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामसेवकाने एकाच व्यक्तीच्या नावे दोनदा लाखो रुपयांची रक्कम काढून त्याचा वापर केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या प्रकरणी संबंधित ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत सुसरे गावातील सुरेश उदागे, दत्तात्रय कंठाळी, सतीश पिसोटे, संदीप उदागे, महेश उदागे, रेवंनाथ उदागे आदी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात ग्रामसेवक गणेश बाबासाहेब ढाकणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
निवेदनानुसार, सुसरे गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकासासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला होता. या निधीतील काही रक्कम शिल्लक असताना २४ मार्च २०२५ रोजी ग्रामसेवक ढाकणे यांनी अनिकेत अजिनाथ शिरसाठ या एकाच व्यक्तीच्या नावे प्रत्येकी २ लाख ८ हजार रुपये अशी रक्कम दोन वेळा काढली.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी आवाज उठवला. त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर १३ मार्च २०२६ रोजी ही रक्कम पुन्हा बँक खात्यात जमा करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, दलित वस्ती योजनेतील निधीचा असा वापर कसा करण्यात आला, याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सुरेश उदागे यांनी स्वतंत्र निवेदनाद्वारे ग्रामसेवक ढाकणे हे गावात नियमित हजर राहत नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे ग्रामपंचायतीची कामे ठप्प झाली असून नागरिकांना विविध दाखले मिळवताना अडचणी येत आहेत. तक्रार केल्यास संबंधितांकडून धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
माहिती अधिकारातून माहिती मागवल्यानंतर ग्रामसेवक गावात येणे टाळत असल्याचा आरोप करत त्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

COMMENTS