पुणे : येरवडा खुले जिल्हा कारागृहात कैद्यांच्या मानसिक आरोग्य व भावनिक स्थैर्यासाठी विशेष ट्विन हार्ट मेडिटेशन (द्वि हृदय ध्यानधारणा) सत्राचे आयो

पुणे : येरवडा खुले जिल्हा कारागृहात कैद्यांच्या मानसिक आरोग्य व भावनिक स्थैर्यासाठी विशेष ट्विन हार्ट मेडिटेशन (द्वि हृदय ध्यानधारणा) सत्राचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम गुरूवारी 12 मार्च रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत पार पडला. कारागृह व सुधार सेवा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कारागृह व सुधार सेवा विभागाचे महासंचालक व महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, विशेष महानिरीक्षक योगेश देसाई तसेच पश्चिम विभागाचे उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. योग विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने कैद्यांसाठी हे ध्यानसत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी संपदा परदेशी, ज्योतिका पवार (प्रशिक्षक), सुनयना पाटील आणि योगेश परदेशी हे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राणिक हीलिंग आणि ट्विन हार्ट मेडिटेशन या पद्धतींची ओळख करून देण्यात आली. यानंतर उपस्थित कैद्यांसाठी मार्गदर्शित ध्यानसत्र घेण्यात आले. या सत्रामागील उद्देश कैद्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण करणे, अंतर्मनाची शांतता वाढवणे तसेच भावनिक आणि मानसिक स्वास्थ्य मजबूत करणे हा होता. सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तरांचा संवादात्मक भाग घेण्यात आला. यावेळी सहभागी कैद्यांनी उत्साहाने सहभाग घेत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली आणि या उपक्रमाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्राणिक हीलिंग ही औषध किंवा स्पर्शाविना केली जाणारी उपचारपद्धती मानली जाते. या पद्धतीचे संस्थापक ग्रँड मास्टर चोआ कॉक सुई यांनी ऊर्जा शरीरातील प्राणशक्तीचा उपयोग करून शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीचे तंत्र विकसित केले आहे. सध्या ही पद्धत जगातील अनेक देशांमध्ये प्रचलित असून तिच्या माध्यमातून ध्यान आणि ऊर्जा संतुलनावर भर दिला जातो. द्वि हृदय ध्यानधारणा ही त्याच पद्धतीचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते. या कार्यक्रमाला येरवडा खुले जिल्हा कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नागेश कांबळे, सुभेदार सुनील गायकवाड, हवालदार राजेंद्र धनगर, प्रकाश भोसले तसेच कारागृह कर्मचारी संतोष शिंगारे, निलेश मांढरे, मोसिन जमादार, महिला शिपाई शैला कदम यांच्यासह अनेक कर्मचारी आणि कैदी उपस्थित होते. कैद्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेत मानसिक आरोग्य आणि सकारात्मक विचारसरणी महत्त्वाची असल्याने अशा प्रकारचे उपक्रम उपयुक्त ठरतात, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS