Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात एलपीजी गॅस पुरवठा नियमित सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा ; अफवा न पसरवण्याचे विरोधकांना आवाहन

नागपूर : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असताना घरगुती स्वयंपाक गॅसच्या उ

इंधन टंचाईच्या अर्थव्यवस्थेला हादरे !
अन्यथा इराणच्या सर्वोच्च नेत्याला लक्ष्य करू : डोनाल्ड ट्रम्प
‌एलपीजी टंचाई : वास्तव आणि वावड्या!


नागपूर : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर देशातील इंधन पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त होत असताना घरगुती स्वयंपाक गॅसच्या उपलब्धतेवरूनही सध्या वाद निर्माण झाला आहे. अनेक शहरांत गॅस सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी पुढे येत असताना राज्य सरकार मात्र गॅस टंचाईचे वृत्त फेटाळून लावत आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचा ठाम दावा करत विरोधी पक्षांवर जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा आरोप केला आहे.
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांनी सिलेंडर बुक केल्यानंतरही वेळेवर पुरवठा होत नसल्याची तक्रार केली आहे. काही ठिकाणी नागरिकांना पहाटेपासून एजन्सीसमोर थांबावे लागत असल्याने गॅस उपलब्धतेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, संभाव्य टंचाईची चर्चा सर्वसामान्यांमध्ये पसरली. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णपणे नाकारत राज्यातील गॅस पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मते, केंद्र सरकार तसेच गॅस वितरण कंपन्यांनीही घरगुती गॅस पुरवठ्यावर कोणतेही संकट नसल्याचे स्पष्ट केले आहे. दर महिन्याला नागरिकांना जितका गॅस आवश्यक असतो तितकाच पुरवठा होत असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काही राजकीय पक्ष जाणीवपूर्वक जनतेमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी घाईघाईने सिलेंडर घेण्यासाठी रांगा लावाव्यात आणि परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे चित्र निर्माण व्हावे, यासाठी अफवा पसरवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. नागरिकांनी अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये आणि नियमित पद्धतीने गॅस बुकिंग करावे, असे आवाहनही त्यांनी केले. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार घरगुती गॅस सिलेंडरचा साठा पुरेसा असून वितरण यंत्रणा पूर्ववत सुरू आहे. नागरिकांना वेळेत गॅस मिळावा यासाठी बुकिंगची प्रक्रिया सुरू असून वितरणात कोणताही अडथळा नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तथापि, प्रत्यक्ष परिस्थितीत काही ठिकाणी विलंब होत असल्याचे मान्य करत प्रशासनाने त्यामागील कारणे वाहतूक, मागणीतील अचानक वाढ किंवा स्थानिक स्तरावरील वितरणातील अडचणी अशी असू शकतात, असेही संकेत दिले आहेत.

राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
संभाव्य तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक सेवा अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार सर्वप्रथम सार्वजनिक सेवेशी संबंधित संस्थांना गॅस पुरवठा प्राधान्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णालये, शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रम, विद्यार्थी वसतिगृहे, शासकीय खानावळी, मध्यान्ह भोजन योजना आणि अंगणवाडी केंद्रांना पूर्ण क्षमतेने गॅस पुरवठा करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय या सर्व संस्थांच्या गॅस पुरवठ्याबाबत गॅस वितरण संस्थांनी नियमित अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

COMMENTS