संगमनेर : देशामध्ये निर्माण झालेल्या भीषण गॅस टंचाई व दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर

संगमनेर : देशामध्ये निर्माण झालेल्या भीषण गॅस टंचाई व दरवाढी विरोधात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने भव्य निदर्शने करत आंदोलने करण्यात आली. याचबरोबर केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याबाबत गॅस उपलब्धता करून तातडीने दरवाढ कमी करावी अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली आहे.
यावेळी युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, नवनाथ आरगडे, प्रमिला अभंग, पद्माताई थोरात, राजू खरात, शिवाजी जगताप, बाबासाहेब गायकर, विलास वरपे,भास्कर शर्माळे, योगिता सातपुते यांसह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, गॅस दरवाढीचा फटका हा सर्वसामान्य कुटुंबाला बसला आहे. गॅस मिळत नाही. रांगाच्या रांगा लागल्या आहेत. अमेरिका आणि आखाती देशांमधील युद्धाचे कारण अजून कुणालाही माहित नाही. यामुळे गॅस दरवाढ झाली असून महिलांमध्ये मोठी प्रचंड नाराजी आहे. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये अवघ्या साडेतीनशे रुपयाला गॅस सिलेंडर मिळत होता मात्र आता त्याची किंमत हजार रुपये झाली आहे. हेच का अच्छे दिन असा सवाल करताना केंद्र सरकार हे गोरगरिबांच्या विरोधी असून तातडीने गॅस दरवाढ कमी करावी व सर्वसामान्य नागरिकाला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली.
अजय फटांगरे म्हणाले की केंद्र सरकार हे थापेबाज सरकार आहे. अमेरिके पुढे केंद्र सरकार झुकले असून रशियाबरोबर करार करण्यासाठी अमेरिकेची परवानगी लागते आहे. हीच का 56 इंची छाती असा सवाल करताना तातडीने गॅस दरवाढ मागे घ्या अन्यथा भारतामध्ये तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी निवेदन स्वीकारले.

COMMENTS