मुंबई : देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड होत असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयं

मुंबई : देशाच्या सार्वभौमत्वाशी आणि आर्थिक स्वायत्ततेशी तडजोड होत असल्याचा आरोप करत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंगळवारी मुंबईतील फोर्ट परिसरातील ठाकरसी हाऊस येथे महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत 23 मार्च रोजी नागपूर येथे संघ मुख्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.
बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर तीव्र टीका केली. देशाच्या आर्थिक धोरणांपासून ते राजकीय निर्णयांपर्यंत अनेक बाबतीत सरकारने माघार घेतल्याचा आरोप त्यांनी केला. अॅड. आंबेडकर म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक तसेच राजकीय स्वायत्तता धोक्यात येत असल्याची भावना निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय दबावाखाली निर्णय घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही आर्थिक व्यवहारांबाबत परदेशी प्रभाव वाढत असल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. या पार्श्वभूमीवर देशाच्या हिताचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी 23 मार्च रोजी नागपूर येथे संघ मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनातून संघाकडेही काही प्रश्न उपस्थित केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आंबेडकर यांनी मध्यमवर्गीय नागरिकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. देशातील आर्थिक निर्णयांचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होऊ शकतो, त्यामुळे विविध क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
या बैठकीत काँग्रेस पक्षानेही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, प्रकाश आंबेडकर यांनी मांडलेले मुद्दे सध्याच्या परिस्थितीत महत्त्वाचे आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली 23 मार्च रोजी होणार्या आंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असेल आणि पक्षाचे कार्यकर्तेही त्यात सक्रियपणे सहभागी होतील. मात्र पंतप्रधानांवर केले जाणारे आरोप सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे समोर येणेही आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.


COMMENTS