अहिल्यानगर : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दोन लाखांपर्यंतच्या थकीत पीक कर्जमाफीची केलेली घोषणा स्वागतार्ह असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही काळजी घेतल्याचे दिसते. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, वीज सवलत कायम ठेवणे, सौरऊर्जेला प्रोत्साहन, कृषी क्षेत्रातील स्टार्टअपना चालना, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन तसेच शेतीतील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढविण्याचे संकल्पही सकारात्मक असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. मात्र या सर्व उपाययोजनांमुळे शेती व शेतकऱ्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कायाकल्प होणार का, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या घोषणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात कितपत बदल होईल, त्यांच्या प्रमुख अडचणी दूर होतील का, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या अंदाजानुसार कर्जमाफीच्या घोषणेमुळे सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मात्र महाराष्ट्रात दीड कोटींहून अधिक शेतीखाती असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेबाहेर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आखातात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर होत असून हजारो कंटेनर अडकून पडल्याने केळी, द्राक्षे तसेच अन्य फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन त्यांनाही दिलासा देणारी घोषणा अर्थसंकल्पात होईल, अशी अपेक्षा होती, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक अर्थसंकल्पात शेतीसाठी अनेक घोषणा केल्या जातात; मात्र शेतकऱ्यांच्या जीवनात अपेक्षित बदल दिसून येत नाही. आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनक आहे. वारंवार कर्जमाफीची मागणी पुढे येते आणि काही वेळा कर्जमाफी जाहीर होते. मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय म्हणून राज्य सरकारने ठोस धोरण आखणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला आणि शेती उत्पादनांना विविध संकटांपासून संरक्षण देण्यासाठी ‘इर्मा’सारखी योजना राबविण्यात आली, तर शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीच्या चक्रातून मुक्तता मिळेल. त्याचबरोबर शाश्वत उत्पन्नाची हमी मिळून शेतकऱ्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कायाकल्प होऊ शकतो, असेही डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले.

अहिल्यानगर : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात दोन लाखांपर्यंतच्या थकीत पीक कर्जमाफीची केलेली घोषणा स्वागतार्ह असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचीही काळजी घेतल्याचे दिसते. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर, वीज सवलत कायम ठेवणे, सौरऊर्जेला प्रोत्साहन, कृषी क्षेत्रातील स्टार्टअपना चालना, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन तसेच शेतीतील पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढविण्याचे संकल्पही सकारात्मक असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले.
मात्र या सर्व उपाययोजनांमुळे शेती व शेतकऱ्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कायाकल्प होणार का, हा खरा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. या घोषणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात कितपत बदल होईल, त्यांच्या प्रमुख अडचणी दूर होतील का, याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या अंदाजानुसार कर्जमाफीच्या घोषणेमुळे सुमारे ५० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. मात्र महाराष्ट्रात दीड कोटींहून अधिक शेतीखाती असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी या योजनेबाहेर राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आखातात सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा परिणाम राज्यातील शेतकऱ्यांवर होत असून हजारो कंटेनर अडकून पडल्याने केळी, द्राक्षे तसेच अन्य फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची दखल घेऊन त्यांनाही दिलासा देणारी घोषणा अर्थसंकल्पात होईल, अशी अपेक्षा होती, असे त्यांनी सांगितले.
प्रत्येक अर्थसंकल्पात शेतीसाठी अनेक घोषणा केल्या जातात; मात्र शेतकऱ्यांच्या जीवनात अपेक्षित बदल दिसून येत नाही. आत्महत्यांचे प्रमाणही चिंताजनक आहे. वारंवार कर्जमाफीची मागणी पुढे येते आणि काही वेळा कर्जमाफी जाहीर होते. मात्र या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय म्हणून राज्य सरकारने ठोस धोरण आखणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला आणि शेती उत्पादनांना विविध संकटांपासून संरक्षण देण्यासाठी ‘इर्मा’सारखी योजना राबविण्यात आली, तर शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफीच्या चक्रातून मुक्तता मिळेल. त्याचबरोबर शाश्वत उत्पन्नाची हमी मिळून शेतकऱ्यांच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने कायाकल्प होऊ शकतो, असेही डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी सांगितले.

COMMENTS