पुणे : परभणीचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांची यंदाच्या ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्माना’साठी निवड झाली आहे. मराठी काव्यविश्वातील त्यांच्

पुणे : परभणीचे ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांची यंदाच्या ‘कविश्रेष्ठ कुसुमाग्रज स्मृती सन्माना’साठी निवड झाली आहे. मराठी काव्यविश्वातील त्यांच्या सातत्यपूर्ण आणि समृद्ध योगदानाची दखल घेत विदिशा विचार मंचतर्फे हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी पुण्यात पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक व संतसाहित्य अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते भालेराव यांना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी दिली. या सन्मानाचे हे चौथे वर्ष आहे. यापूर्वी अरूण म्हात्रे, वसंत आबाजी डहाके आणि डॉ. अरूणा ढेरे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. रोख पाच हजार रुपये, मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे. इंद्रजित भालेराव यांनी मराठी साहित्यात विविधांगी लेखन केले असून त्यांच्या पंधरा काव्यसंग्रहांसह ललित लेखसंग्रह आणि संपादित ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. राज्य शासनासह अनेक साहित्यसंस्थांकडून त्यांना यापूर्वीही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कवितांचे इतर भाषांमध्येही अनुवाद प्रसिद्ध झाले असून विविध राज्यांच्या तसेच राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश करण्यात आला आहे. विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. हा सन्मान सोहळा मंगळवार, 10 मार्च 2026 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पुण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रस्ता, डेक्कन येथे होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS