बारामती विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएची कारवाईमुंबई : बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालया

बारामती विमान दुर्घटनेनंतर डीजीसीएची कारवाई
मुंबई : बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी घडलेल्या विमान दुर्घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने कठोर प्रशासकीय पावले उचलली आहेत. या अपघातात राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले होते. घटनेनंतर संबंधित कंपनीच्या सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्यात आली असून, त्याआधारे चार विमानांना तत्काळ उड्डाणबंदी घालण्यात आली आहे.
अपघातग्रस्त लिअरजेट 45 (नोंदणी क्रमांक व्हीटी-एसएसके) हे विमान व्हीएसआर व्हेन्चर प्रा. लि. या कंपनीच्या ताफ्यातील होते. दुर्घटनेनंतर कंपनीच्या देखभाल प्रणाली, सुरक्षा मानकांचे पालन आणि उड्डाण संचालन प्रक्रियेबाबत विविध स्तरांतून प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर महासंचालनालयाने विशेष सुरक्षा लेखापरीक्षण हाती घेतले. या तपासात विमान उड्डाणयोग्यता, हवाई सुरक्षा आणि उड्डाण संचालनाशी संबंधित विभागांमध्ये मंजूर प्रक्रियांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. विशेषतः देखभाल प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे अधिकार्यांनी नमूद केले आहे. आवश्यक नोंदी आणि तांत्रिक मानकांचे पालन न झाल्याची बाबही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या लिअरजेट 40/45 प्रकारातील व्हीटी-व्हीआरए, व्हीटी-व्हीआरएस, व्हीटी-व्हीआरव्ही आणि व्हीटी-टीआरआय या चार विमानांना पुढील आदेशापर्यंत उड्डाण करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आवश्यक तांत्रिक मानकांची पूर्तता होईपर्यंत ही विमानं जमिनीवरच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. महासंचालनालयाच्या या निर्णयामुळे विमान सुरक्षेबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, अपघाताच्या कारणांचा अंतिम अहवाल येणे बाकी असून, संबंधित यंत्रणा तपास प्रक्रिया पुढे नेत आहेत.

COMMENTS