श्रीगोंदा : शिवरायांच्या धगधगत्या ज्योतीसोबत त्यांचे धगधगते विचार जीवनात अंगीकारले, तर महाराष्ट्रात शिवरायांना अपेक्षित असणारे स्वराज्य नक्कीच उभे

श्रीगोंदा : शिवरायांच्या धगधगत्या ज्योतीसोबत त्यांचे धगधगते विचार जीवनात अंगीकारले, तर महाराष्ट्रात शिवरायांना अपेक्षित असणारे स्वराज्य नक्कीच उभे राहील, असा विश्वास सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केला.
वांगदरी येथील श्री छत्रपती ग्रुपच्या वतीने शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथून वांगदरीपर्यंत शिवज्योत आणण्यात आली. या ज्योतीचे वांगदरी येथे स्वागत करताना नागवडे बोलत होते. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य स्थापन केले. स्वराज्यातील प्रत्येक कुटुंब हे माझे कुटुंब आहे आणि प्रत्येक सदस्य हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे, या भावनेतून त्यांनी राज्यकारभार केला. त्यामुळे अठरा पगड जातीतील लोकांना राजे आपले वाटत होते. त्यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास निर्माण झाल्याने कोणत्याही भौतिक सुविधा नसतानाही मावळे सैन्यात सामील झाले आणि प्राणपणाने साथ दिली. त्यातूनच अलौकिक व अविस्मरणीय स्वराज्य उभे राहिले. आजच्या तरुणांनी शिवरायांचे तेच जाज्वल्य विचार अंगीकारल्यास अपेक्षित समाजव्यवस्था उभी राहू शकते, असेही नागवडे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य विठ्ठल नागवडे, खरेदी-विक्री संघाचे माजी संचालक साहेबराव महानोर, सरपंच सुजाता नागवडे, माजी सरपंच आदेश नागवडे, संजय नागवडे, शिवाजी चोरमले, मारुती मदने, अशोक मासाळ, मुख्याध्यापक बापूराव भिसे, विष्णू मोहिते, काशिनाथ पारखे, आप्पा टुले, हनुमंत काटे, विजय नागवडे, रामचंद्र गवळी यांच्यासह वांगदरी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. योगेश शेलार यांचे व्याख्यान झाले. प्रास्ताविक किरण नागवडे यांनी केले, तर सरपंच सुजाता नागवडे यांनी आभार मानले. माजी सरपंच आदेश नागवडे यांनी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली.

COMMENTS