कोलकाता ः माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे रविवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. प्रकृती

कोलकाता ः माजी रेल्वेमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल रॉय यांचे रविवारी मध्यरात्रीनंतर निधन झाले आहे. ते 71 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर कोलकात्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पुत्र शुभ्रांशू रॉय यांनी निधनाची माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मुकुल रॉय हे पश्चिम बंगालच्या राजकारणातील प्रभावी आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जात. तृणमूल काँगे्रस या पक्षाच्या स्थापनेपासून ते सक्रिय होते आणि संघटन उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत त्यांनी पक्षाची मुळे तळागाळात घट्ट केली. त्यांच्या संघटन कौशल्यामुळेच तृणमूल काँग्रेस राज्यात सत्तेपर्यंत पोहोचली, असे मानले जाते. ते 2006 साली राज्यसभेवर निवडून गेले. 2009 ते 2012 या काळात त्यांनी राज्यसभेत पक्षाचे नेतृत्व केले. केंद्रातील संयुक्त प्रगतीशील आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे रेल्वे खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या कामकाजातील शिस्त, नियोजनशक्ती आणि राजकीय दूरदृष्टीमुळे त्यांना बंगालच्या राजकारणातील ‘चाणक्य’ अशीही ओळख मिळाली. मात्र पुढील काळात पक्षांतर्गत मतभेद वाढले. विविध वादग्रस्त प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर 2015 मध्ये त्यांना पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव पदावरून दूर करण्यात आले. अखेरीस 2017 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आणि त्याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यात लक्षणीय यश मिळवून देण्यात त्यांचा वाटा मानला जातो.

COMMENTS