Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विदर्भासह मराठवाड्यात अवकाळी पावसाचा तडाखा

रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ; शेतकरी अडचणीतविदर्भ, मराठवाडा तसेच कोकणातील काही भागांत रविवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी

Yeola : पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Video)
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क
नववर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईत पावसाच्या सरी

रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान ; शेतकरी अडचणीत
विदर्भ, मराठवाडा तसेच कोकणातील काही भागांत रविवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आधीच वाढत्या उत्पादन खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांची चिंता या अनपेक्षित पावसामुळे अधिकच वाढली आहे.
विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत मध्यरात्री वादळी पावसाने धुमाकूळ घातला. नागपूर शहरातील अनेक सखल भागांत पाणी साचले, तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याची नोंद आहे. मनिष नगर परिसरातील भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचल्याने सकाळच्या वेळी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली. सोनेगाव आणि सोमलवाडा परिसरातही अशीच परिस्थिती दिसून आली. हवामान विभागाने विदर्भ आणि मध्य भारतावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यातील लातूर शहरातही उकाड्यानंतर मध्यरात्रीपासून पावसाच्या सरी कोसळल्या. पहाटेच्या सुमारास शहरातील विविध भागांत जोरदार पाऊस झाला. राजीव गांधी चौक, उद्योग भवन, गरुड चौक आदी परिसरांत काही काळ रस्त्यांवर पाणी साचले. जरी या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी शेतकर्‍यांच्या दृष्टीने हा पाऊस चिंतेचा ठरला आहे. धाराशिव जिल्ह्यात पहाटे पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या ज्वारीला फटका बसला. पावसाचे पाणी साचल्याने ज्वारी काळी पडण्याची शक्यता आहे. तसेच हरभरा, गहू, द्राक्ष आणि आंबा या पिकांनाही नुकसान होण्याची भीती आहे. तुळजापूर तालुक्यात काही ठिकाणी उभ्या ज्वारीचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. बीड जिल्ह्यातील मांडेखेल परिसरात अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या पावसामुळे उभे पीक आडवे पडले, तर काही ठिकाणी कणसांना पाणी लागले. परिणामी उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकर्‍यांनी तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

कोकणाताही पावसाचा धुमाकूळ
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हवामानात बदल जाणवला. फोंडाघाट परिसरात सायंकाळी झालेल्या पावसामुळे गारवा निर्माण झाला. मात्र ढगाळ वातावरण आणि अवकाळी सरींमुळे आंबा आणि काजू पिकांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बागायतदारांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण आहे. अवकाळी पावसाचे हे सत्र पुढील काही दिवस सुरू राहिल्यास रब्बी हंगामातील काढणीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करावी, अशी मागणी विविध भागांतून पुढे येत आहे.

COMMENTS