दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांचे प्रतिपादनमुंबई ः छत्रपती शिवाजी महाराजांचा एक-एक पैलूंवर बोलायचे झाल्यास वेळ कमी पडेल, मात्र आज

दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांचे प्रतिपादन
मुंबई ः छत्रपती शिवाजी महाराजांचा एक-एक पैलूंवर बोलायचे झाल्यास वेळ कमी पडेल, मात्र आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थापत्यशास्त्र अजरामर आहे. शिवरायांनी बांधलेले किल्ले, नाविन्यपूर्ण जलदुर्ग, गुप्त दरवाजे, धान्य साठवण्याच्या पद्धती, शत्रुंनी गड-किल्ल्यांवर हल्ले करू नये, यासाठी स्थापत्यशास्त्रांचा अभ्यास करून त्यांनी केलेली रचना आजही अमरामर असल्याचे प्रतिपादन दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी शुक्रवारी केले.
मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम येथील विश्वेश्वरैय्या सभागृहात उपस्थित स्थापत्य अभियंत्यांसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशेष व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता श्रीमती कुंभारे, उप अभियंता प्रशांतगायकवाड, अशोक गायकवाड, अभिमान माने, शाखा अभियंता रसाळ उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. सोनवणे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-धर्मांच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्यांनी लोककल्याणाचा वसा घेतला होता, त्यामुळे आपल्या राज्यात शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही कुणी धक्का लावता कामा नये, अशी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची होती. त्यामुळे खर्या अर्थाने गोर-गरीबांना, विविध जाती धर्मांतील माणसांना न्याय देण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांनी स्थापत्य शास्त्रांमध्ये केलेले काम अद्भूत आहे. मुरूड जंजिरासारखा किल्ला आजही त्याची साक्ष देतो. गड-किल्ल्यांची रचना कशी असावी, तेथे खडक कोणता आहे, तो शत्रूंच्या तोफेचा सामना करू शकेल, इथपर्यंतचा बारकाईने अभ्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता, त्यातूनच त्यांनी अनेक अभेद्य गड-किल्ल्यांची निर्मिती केली. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी संत तुकारामांचा आदर्श समोर ठेवला, तर महात्मा फुल्यांनी छत्रपतींचा आदर्श समोर ठेवला, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना गुरू मानले, ही गुरू-शिष्य परंपरेतील शृंखला असून, त्यांनी नेहमीच मानवतेचा विचार केला. त्यातून लोककल्याण कसे साधता येईल असा प्रमुख विचार त्यांच्या डोळ्यासमोर होता, असे महत्वपूर्ण विचार डॉ. अशोक सोनवणे यांनी आपल्या भाषणातून मांडले. यासोबतच उपस्थित स्थापत्य अभियंत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्थापत्यशास्त्रांतील दुर्मिळ पैलूंवर प्रकाश पाडण्याचे काम करावे, त्यातून त्याकाळची स्थापत्यशैली, त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा दुरदृष्टीकोन समोर येईल, त्यासाठी स्थापत्य शास्त्रांतील अभियंत्यांनी संशोधन करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे मत डॉ. सोनवणे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित स्थापत्य अभियंत्यांनी मनापासून दाद दिली. या सुंदर आणि नेटक्या कार्यक्रमाचे आयोजन शाखा अभियंता वैभव शिंदे यांनी केले होते.

COMMENTS