नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर आं

नांदेड : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ नांदेडमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, त्याचे पडसाद नांदेड शहरातही उमटले.
मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौरांच्या दालनात असलेल्या टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून आधीच वाद निर्माण झालेला असताना, हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य व स्वराज्याचा विचार दिला, त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनीही कार्य केले असून त्यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे, असे विधान केले होते. या वक्तव्यावर विविध स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर नांदेड महानगर भाजपाच्या वतीने महात्मा फुले पुतळ्यासमोर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या छायाचित्राला जोडे मारून संताप व्यक्त केला. छत्रपती शिवरायांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर काही काळ दणाणून गेला. यावेळी बोलताना महापौर कविता मुळे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांची कोणाशीही तुलना करणे अयोग्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत असून, हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, चैतन्यबापू देशमुख, नगरसेवक आशिष नेरलकर, शितल खांडील, मिलिंद देशमुख, बालाजी गिरगावकर, अभिषेक सौदे, वैजनाथ देशमुख, सतीश बसवदे, राजू लांडगे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, शितल भालके यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या व भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. आंदोलनामुळे आणि जमलेल्या गर्दीमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्परतेने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. सध्या या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून पुढील काळात यावरून आणखी प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या निषेध आंदोलनातून नांदेड शहरातील राजकीय वातावरण आणखी तापल्याचे दिसून आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि घोषणाबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी संयम राखत परिस्थिती सुरळीत ठेवली. राजकीय वर्तुळात या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असून, सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला, तर अनेकांनी ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या तुलनेबाबत संवेदनशीलता राखण्याची गरज व्यक्त केली. या प्रकरणामुळे आगामी काळात राजकीय चर्चांना वेग येण्याची चिन्हे असून, संबंधितांकडून पुढील भूमिका काय घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS