विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांच्या पदग्रहण समारंभात विकास, समन्वय आणि
विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा
नांदेड ः नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर-उपमहापौरांच्या पदग्रहण समारंभात विकास, समन्वय आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या अपेक्षांपेक्षा राजकीय टोले, सूचक इशारे आणि ‘पुनर्वसनाचे प्रस्ताव’ यांचीच चर्चा अधिक रंगली. मंचावरून बोलताना खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी शब्दांची अशी काही फटकेबाजी केली की सभागृहात हशा, टाळ्या आणि भुवया उंचावण्याचे दृश्य एकाच वेळी पाहायला मिळाले.
महापालिका निवडणुकीतील भाजपाच्या अभूतपूर्व यशाचे श्रेय देताना गोपछडे यांनी थेट आणि ठामपणे अशोकराव चव्हाण यांचे नाव घेतले. यशाला एक चेहरा असतो, अशा आशयाचे हे भाष्य होते. मात्र त्याच श्वासात त्यांनी भाजपाचे महानगराध्यक्ष व माजी आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्याकडे बोट दाखवत ‘कृपादृष्टी’चा विषय उघड केला. अर्थ स्पष्ट होता-राजूरकर यांना पुन्हा विधान परिषदेत पाठवण्याची वेळ आली आहे, आणि त्या तिकीटावर सही कुणाची हवी, हेही सभागृहाला समजले. नांदेड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळाल्यानंतर पाठोपाठ महानगरपालिका निवडणुकीत भाजपा सेना युतीच्या बाजूने 50 नगरसेवक असल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत येणार्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवाराचा निश्चित विजय होऊ शकतो हे गणित लक्षात घेऊन आगामी काळात विधान परिषदेची संधी नांदेड मधील दोन राजकीय नेत्यांना मिळू शकते याबद्दल सुतोवाच डॉ. गोपछडे यांच्या तोंडून निघाले… हे सांगत असताना गोपछडे यांनी मला राजूरकर किंवा हंबर्डे यांनी विधान परिषदेचे तिकीट मिळावे याबद्दल सांगितलेले नाही असा खुलासा केला.
राजकीय इतिहासाची उजळणी करताना डॉ.गोपछडे म्हणाले, काँग्रेसमध्ये असताना राजूरकरांनी महापालिका हातात ठेवली, भाजपात आल्यानंतर पुन्हा महानगराध्यक्षपद मिळाले-मग आता पुढचा ‘अपग्रेड’ का नाही? या प्रश्नावर काहींनी माना डोलावल्या, तर काहींनी हास्य दडवत वहीत नोंदी केल्या. यावरच न थांबता, नांदेड दक्षिण ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांच्या लोकसभा पराभवाचा विषय काढत गोपछडे यांनी पराभव म्हणजे राजकारणाचा शेवट नाही, पुनर्वसनाचा प्रारंभ असू शकतो, असा प्रेमळ सल्ला दिला. या एका वाक्याने सभागृहात राजकीय भुवया एकाच वेळी उंचावल्या-कारण पुनर्वसनाच्या यादीत नावे वाढत चालली होती. शिवसेनेच्या आमदारांवर बोलताना गोपछडे यांनी उपरोधाचा रंग अधिक गडद केला. नांदेड उत्तर-दक्षिणचे आमदार अतिशय चाणाक्ष असल्याचे सांगत त्यांनी महापालिका निवडणूक ही ताकद मोजण्याची ‘टेस्ट मॅच’ होती, असे हसत हसत सांगितले. निकालानंतर पुन्हा भाजपाशी मिठी-कधी कुणाबरोबर जायचे, हे या आमदारांना पटकन कळते, हा टोला ऐकून सभागृहात कुजबुज वाढली.
दरम्यान, नव्या महापौरांना गोपछडे यांनी प्रशासनाचा धडा देत महिन्यातून किमान दोन वेळा जनता दरबार घ्यावा, पारदर्शक कारभार ठेवावा, असा सल्ला दिला-जणू राजकीय कुस्तीच्या मैदानातून थेट प्रशासकीय वर्गात नेणारी घोषणा. कार्यक्रमानंतर मात्र खरी चर्चा रंगली ती वेगळीच. अशोकरावांचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्ष मान्य झाले, असे काहींनी म्हटले. तर निष्ठावंत भाजपाचे खासदार म्हणून ओळखले जाणारे गोपछडे, अशोकरावांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनाची शिफारस करतात-हे किती संयुक्तिक? असा सवाल कार्यकर्त्यांमध्ये घुमू लागला. एकूणच, हा पदग्रहण समारंभ विकासाच्या घोषणांपेक्षा राजकीय पुनर्वसनाच्या प्रस्तावांचा ‘लाइव्ह शो’ ठरला. मंचावरून फेकलेले टोले, दिलेले सल्ले आणि वाचलेले संकेत-यांनी नांदेडच्या राजकारणात पुढच्या काही दिवसांची चर्चा पक्की करून टाकली, एवढे मात्र नक्की.

COMMENTS