कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष आ. बी. वाय. विजयेंद्र यांचे खा.अशोकराव चव्हाण यांना ठाम आश्वासननांदेड । प्रतिनिधीनांदेड-बिदर हा बहुप्रतिक्षित आणि सीमाव

कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष आ. बी. वाय. विजयेंद्र यांचे खा.अशोकराव चव्हाण यांना ठाम आश्वासन
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड-बिदर हा बहुप्रतिक्षित आणि सीमावर्ती विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला नवीन रेल्वे मार्ग कर्नाटक राज्य सरकारकडून अपेक्षित मंजुरी न मिळाल्याने रखडला आहे. मात्र, या प्रकल्पाला गती देण्यासाठी कर्नाटक विधानसभेच्या येत्या अधिवेशनात हा प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचे ठाम आश्वासन कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिले आहे. माजी मुख्यमंत्री व खासदार अशोकराव चव्हाण यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
नांदेड येथे 5 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या जगद्गुरु केदार पीठाधीश्वर श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सव व विश्वशांती महायज्ञ सोहळ्यानिमित्त आ. बी. वाय. विजयेंद्र यांचे सोमवारी सकाळी शहरात आगमन झाले. या दौर्यादरम्यान त्यांनी खा. अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीला औपचारिकतेपुरते न ठेवता, नांदेडच्या विकासाशी निगडित ज्वलंत प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. या चर्चेवेळी खा. अशोकराव चव्हाण यांनी नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केले की, केंद्र व राज्य सरकारांच्या 50:50 खर्च भागीदारीतून हा प्रकल्प राबविण्यास केंद्र सरकारने यापूर्वीच संमती दिली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील भाजप सरकारने या प्रकल्पातील आपल्या हिस्स्याचा खर्च उचलण्याबाबत मंत्रिमंडळ निर्णयही घेतला आहे. मात्र, कर्नाटक राज्य सरकारकडून अद्याप या प्रकल्पासाठी आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यास औपचारिक मंजुरी देण्यात आलेली नाही. परिणामी, सीमावर्ती भागातील जनतेसाठी अत्यंत उपयुक्त असलेला हा रेल्वे मार्ग केवळ कागदावरच अडकून राहिल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यावेळी वरिष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी तसेच नांदेड जिल्हा रेल्वे समितीचे सचिव व वरिष्ठ पत्रकार शंतनू डोईफोडे उपस्थित होते. त्यांनीही प्रकल्पाच्या सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक महत्त्वावर प्रकाश टाकत, कर्नाटक सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली. सीमावर्ती जिल्ह्यांच्या समतोल विकासासाठी हा रेल्वे मार्ग ‘गेमचेंजर’ ठरू शकतो, असे मत यावेळी मांडण्यात आले. नांदेड-बिदर रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास नांदेड येथील श्री हजूर साहिब आणि बिदर येथील नानक झिरा साहिब ही दोन अत्यंत महत्त्वाची शीख तीर्थक्षेत्रे थेट रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. त्यामुळे देश-विदेशातून येणार्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असून, धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. याशिवाय नांदेड ते बंगळुरू दरम्यानचे रेल्वे अंतर लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याने व्यापार, उद्योग आणि रोजगारनिर्मितीसही गती मिळणार आहे. नांदेडकरांच्या भावना लक्षात घेऊन आ. बी. वाय. विजयेंद्र यांनी कर्नाटक विधानसभेच्या येत्या अधिवेशनात हा विषय प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले. हा प्रकल्प केवळ एका राज्याचा नाही, तर दोन राज्यांच्या विकासाला जोडणारा दुवा आहे, असे सांगत त्यांनी कर्नाटक सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. या भेटीच्या वेळी आ. श्रीजया चव्हाण, दक्षिण बिदरचे भाजप आमदार डॉ. शैलेंद्र बेलदळे, बिदर जिल्हा भाजप अध्यक्ष सोमनाथ पाटील, बंगळुरू शहरातील भाजप नेते सिद्धेश, नांदेड महानगरपालिकेतील भाजप गटनेते अॅड. महेश कनकदंडे, माजी सभापती किशोर स्वामी आदी उपस्थित होते. नांदेड-बिदर रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आल्याने, या प्रकल्पाबाबत नांदेडकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

COMMENTS