तुलसी शैक्षणिक समूहात माता रमाई जयंती उत्साहात साजरीबीड । प्रतिनिधीमाता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेड

तुलसी शैक्षणिक समूहात माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बीड । प्रतिनिधी
माता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण आणि समाजकार्यासाठी भक्कम पाठबळ दिले. त्यांच्या त्याग, संयम आणि समर्पणामुळेच बाबासाहेबांना समाज परिवर्तनाचे महान कार्य करता आले. माता रमाई यांच्या जीवनातून संघर्ष, त्याग आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा घेणे आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध वक्त्या डॉ. प्रतिभा जाधव यांनी केले.
तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवार दि. 7 रोजी तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालयात व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुलसी शैक्षणिक समूहाचे संचालक प्रा. प्रदीप रोडे होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून मा.निलेश कदम, प्रा.डी.डी.राऊत, प्रा.डी.जी.निकाळजे, डॉ.अश्विनी बेद्रे व प्रा.प्रकाश ढोकणे उपस्थित होते. डॉ.जाधव यांनी आपल्या व्याख्यानात माता रमाई आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या त्याग, संयम आणि समर्पणाची प्रेरणादायी उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडली. महापुरुषांचे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये रुजले पाहिजेत आणि त्यांच्या कार्याचा आदर्श आपल्या जीवनात उतरवला पाहिजे. आपण त्यांच्या पायाची धूळ होण्याइतके जरी त्यांचे विचार आत्मसात केले तरी जीवन समृद्ध होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, जगण्याला एक ठोस तत्व असले पाहिजे. केवळ जन्माला आलो म्हणून जगणे हे खरे जीवन नसून, आव्हानांचा सामना करत जगण्यातच खरी मजा आहे. महापुरुषांनी आपल्या जीवनात प्रत्येक पावलावर संघर्ष केला आणि म्हणूनच त्यांची आठवण शतकानुशतके जिवंत आहे. चांगले कार्य करणारी माणसे कधीच मरत नाहीत; त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे विचार समाजाला दिशा देत राहतात. आपण वास्तववादी जीवन जगले पाहिजे, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे संविधानवादी विचारसरणी जोपासणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रदीप रोडे यांनी स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ या ग्रंथामधून माता रमाईंच्या त्यागाचा गौरव केला असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन कुटुंब आणि समाजात समानतेचा विचार आचरणात आणण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.योगिता लांडगे यांनी केले, तर आभार प्राचार्य डी.डी.राऊत यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेच्या विविध युनिटमधील पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS