कोपरगाव : अहिल्यानगर जिल्ह्यातील पॉलिटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधील मुलींच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी संजीवनी के. ब
कोपरगाव : अहिल्यानगर जिल्ह्यातील पॉलिटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधील मुलींच्या सांघिक व वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याची संधी संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकला मिळाली आहे. या स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार असून, जीवनात खिलाडू वृत्ती ठेवून यशासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन संजीवनी ग्रुप ऑफ स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी केले.
संजीवनी पॉलिटेक्निकच्या प्रशस्त मैदानावर इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (ई-1 झोन) अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पॉलिटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधील मुलींच्या क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ झाला. यावेळी संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे अध्यक्षस्थानी होते. ई-1 झोनच्या प्रतिनिधी प्रा. आशा म्हस्के, प्राचार्य ए. आर. मिरीकर, जिमखाना विभाग प्रमुख नानासाहेब लोंढे आदी उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या दोनशेहून अधिक मुलींनी तसेच संघ प्रमुखांनी उपस्थिती नोंदवली. प्राचार्य मिरीकर यांनी संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा दृष्टिकोन अधोरेखित केला. संस्थेचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आय. के. सय्यद यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. मोहिनी गुंजाळ यांनी केले.
खेळाला करिअरचे रूप देण्यासाठी ‘खेलो इंडिया’, ‘फिट इंडिया’ चळवळ, क्रीडा पायाभूत सुविधा विकास, तालुका व जिल्हा स्तरावर स्टेडियम तसेच प्रशिक्षण केंद्रे उभारणे, स्थानिक खेळांना प्रोत्साहन देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी संजीवनी युनिव्हर्सिटी अंतर्गत इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट, मुंबईशी संलग्न स्पोर्ट्स मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच इंजिनिअरिंग डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना विविध शाखांमध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश दिला जातो. राज्यस्तरीय क्रीडा निपुणता धारक डिप्लोमा उत्तीर्ण खेळाडूंना 100 टक्के स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.
– अमित कोल्हे, अध्यक्ष, संजीवनी युनिव्हर्सिटी

COMMENTS