खो-खोमध्ये तीन तर कबड्डीत दोन विद्यार्थ्यांची निवड; आंतरविद्यापीठ स्पर्धांसाठी प्रतिनिधित्वबीड । प्रतिनिधीशैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रात आ

खो-खोमध्ये तीन तर कबड्डीत दोन विद्यार्थ्यांची निवड; आंतरविद्यापीठ स्पर्धांसाठी प्रतिनिधित्व
बीड । प्रतिनिधी
शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा क्षेत्रात आपला कायम दबदबा निर्माण करणार्या आदित्य शिक्षण संस्था संचलित आदित्य कृषी महाविद्यालयाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संघात पाच विद्यार्थ्यांची निवड घडवून आणत आपली गुणवत्ता अधोरेखित केली आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळे आदित्यचा डंका विद्यापीठ स्तरावरही घुमत आहे. विद्यापीठ स्तरावरील खो-खो आणि कबड्डी या प्रमुख खेळांच्या संघांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. खो-खो संघात तीन तर कबड्डी संघात दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या निवडीबद्दल संस्थेचे मुख्य प्रवर्तक सुभाषचंद्र सारडा, संचालक डॉ.आदित्य सारडा, संचालिका डॉ. आदिती सारडा यांनी विद्यार्थांचे अभिनंदन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कबड्डी संघासाठी कुंभार सुगंधा व खेडकर मनीषा तर खो-खो संघात शेंडे सौरव, श्रीराम सानिका आणि वाघमारे शैलजा यांना संधी मिळाली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्राध्यापकांचे मार्गदर्शन, क्रीडा शिक्षकांचे परिश्रम आणि विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत महत्त्वाची ठरली आहे. आदित्य शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. आदिती सारडा विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना म्हणाल्या की विद्यार्थ्यांची निवड ही केवळ खेळातील कौशल्यावर आधारित नसून त्यांच्या शिस्त, सांघिक भावना आणि धैर्य या गुणांमुळे झाली आहे. महाविद्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात आले असून आगामी आंतरविद्यापीठ स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. हे खेळाडू विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना उत्कृष्ट कामगिरी करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर परिश्रमामुळे यश
आमचे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही सातत्याने आपली छाप पाडत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, कठोर परिश्रम आणि क्रीडा शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन आहे. आगामी स्पर्धांमध्येही ते निश्चितच उज्ज्वल कामगिरी करतील, असा आम्हाला विश्वास आहे.
– प्राचार्य शाम भुतडा, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड

COMMENTS