महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलात चकमकगडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झाल

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या जंगलात चकमक
गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील अबुझमाडच्या घनदाट जंगलात पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या तीव्र चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या सी-60 पथकाने तीन नक्षलवाद्यांना ठार केले. मात्र, या कारवाईदरम्यान जवानांनी दाखवलेल्या शौर्याला मोठी किंमत चुकवावी लागली असून एका जवानाला वीरमरण आले आहे.
शुक्रवारी सकाळी घटनास्थळी राबविण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान आणखी दोन नक्षलवाद्यांचे (एक पुरुष व एक महिला) मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. यामुळे या संपूर्ण कारवाईत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या तीन (दोन पुरुष व एक महिला) इतकी झाली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी एक एके-47 रायफल, एक एसएलआर रायफल तसेच मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य जप्त केले आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या चकमकीत सी-60 पथकातील जवान दिपक चिन्ना मडावी (वय 38, रा. मांड्रा, ता. अहेरी) गंभीर जखमी झाले होते. त्यांना जंगल परिसरातून हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून भामरागड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे. या चकमकीत जखमी झालेल्या दुसर्या जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) यांनाही हेलिकॉप्टरच्या साहाय्याने सुरक्षित बाहेर काढण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले. त्यांना पुढील उपचारासाठी गडचिरोली येथे हलविण्याची तयारी सुरू आहे. अबुझमाडचा परिसर अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला असून तो दुर्गम आणि नक्षलवादी हालचालींसाठी संवेदनशील मानला जातो. या भागात नक्षलवाद्यांची मोठ्या प्रमाणावर हालचाल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर गडचिरोली पोलिसांनी नियोजनबद्ध मोहीम राबविली. रात्रीपासून सुरू असलेल्या या कारवाईदरम्यान जवानांनी धैर्याने प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांच्या हालचालींवर आळा घालण्याचा प्रयत्न केला. सदर जंगल परिसरात अद्यापही व्यापक शोधमोहीम सुरू असून अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. या कारवाईसंदर्भातील सविस्तर माहिती अधिकृतरीत्या लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे गडचिरोली पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS