Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पालघरमध्ये उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक

पालघर : जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

तर सलमानला त्याच्या ७०० पिढ्या आठवतील | LokNews24
राहुरी खुर्द परिसरातील बिबट्याला जेरबंद करण्यात यश
संघाचे हिंदूत्व पराभूत, तर बहुजनवाद राजकीय सौदेबाजीत बंदिस्त !
Birsa Munda

पालघर : जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखीला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय पालघर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. थोर आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि क्रांतिकारक भगवान बिरसा मुंडा यांचे भव्य स्मारक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभारण्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील आदिवासी समाजात समाधान आणि अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
हा ठराव आमदार विलास तरे यांनी मांडला. ठराव सादर करताना त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानावर प्रकाश टाकला. ब्रिटिश सत्तेविरोधात त्यांनी उभारलेला लढा, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी दिलेले बलिदान तसेच सामाजिक जागृतीसाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, इतक्या महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण जतन करणारे ठोस स्वरूपाचे स्मारक पालघर जिल्ह्यात अद्याप अस्तित्वात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आदिवासी बहुल असलेल्या पालघर जिल्ह्यात भगवान बिरसा मुंडा यांचे स्मारक उभारणे ही केवळ श्रद्धांजली नसून, पुढील पिढ्यांना त्यांच्या विचारांची ओळख करून देणारी ऐतिहासिक गरज आहे. या स्मारकाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा संघर्ष, स्वाभिमान आणि सांस्कृतिक वारसा अधिक व्यापकपणे समोर येईल, असा विश्‍वास आमदार तरे यांनी व्यक्त केला. या ठरावास आमदार शांताराम मोरे यांनी अनुमोदन दिले. त्यांनीही भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत, हा निर्णय आदिवासी समाजाच्या इतिहासाला योग्य सन्मान देणारा आणि समाजात आत्मभान जागवणारा असल्याचे मत मांडले. यानंतर उपस्थित सर्व सदस्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दर्शविला. कोणताही विरोध न होता हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. पालघर जिल्ह्यात उभारले जाणारे हे स्मारक केवळ वास्तू न राहता, आदिवासी अस्मितेचे आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे जिवंत प्रतीक ठरेल, अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली.

COMMENTS