Homeताज्या बातम्यादेश

चिनी मांजामुळे मृत्यू झाल्यास खुनाचा गुन्हा

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णयलखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील हैदरगंज परिसरात चिनी मांजामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्य

योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी
Yogi Adityanath : “पुराव्याशिवाय कोणालाही अटक होणार नाही” (Video)
लखनऊमध्ये भिंत कोसळून 9 मजुरांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारचा निर्णय
लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील हैदरगंज परिसरात चिनी मांजामुळे एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. बंदी असलेल्या चिनी मांजाच्या वापरामुळे होणार्‍या अपघातांना आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली असून, अशा प्रकारच्या मृत्यू प्रकरणांमध्ये आता थेट खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पोलिस यंत्रणेला चिनी मांजाच्या विक्री, साठवणूक आणि वितरणाविरोधात व्यापक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. लखनऊमध्ये घडलेल्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सायंकाळी दुबग्गा परिसरातील रहिवासी असलेला 33 वर्षीय मोहम्मद शोएब दुचाकीवरून हैदरगंज ओव्हरब्रिज परिसरातून जात असताना अचानक चिनी मांज त्याच्या गळ्यात अडकला. तीक्ष्ण धाग्यामुळे त्याच्या मानेतील नसा तुटल्या आणि तो गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर कोसळला. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो सुमारे दहा मिनिटे वेदनेत तडफडत पडून होता. रस्त्याने जाणार्‍या नागरिकांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न करत त्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले; मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, बंदी असूनही चिनी मांजाची खुलेआम विक्री कशी सुरू आहे, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, चिनी मांजामुळे होणारा कोणताही मृत्यू हा अपघात न मानता खुनाचा गुन्हा समजला जाईल आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांनी राज्यभर विशेष मोहीम राबविण्याचे आदेश देत जिल्हानिहाय छापे टाकण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. बेकायदेशीर पुरवठा साखळ्या शोधून काढून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल, तसेच या कारवाईचा उच्चस्तरीय आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

COMMENTS