फक्त 1200 रुपयांच्या लाचेसाठी मुख्याध्यापिका, दोन सहशिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले - जिल्हा परिषद शिक्षण विभागाची मान शरमेने ख

फक्त 1200 रुपयांच्या लाचेसाठी मुख्याध्यापिका, दोन सहशिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले – जिल्हा परिषद शिक्षण विभागाची मान शरमेने खाली
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागात नेमकं काय चाललं आहे, असा संतप्त सवाल आज पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे, तेच शिक्षक आणि मुख्याध्यापक जर पैशांसाठी हात पुढे करत असतील, तर हा केवळ गुन्हा नसून शिक्षण व्यवस्थेवरचा घणाघात आहे. केवळ 1200 रुपयांच्या लाचेसाठी एका जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेसह दोन सहशिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
कंधार तालुक्यातील उस्माननगर येथील जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला. बदली झालेल्या एका शिक्षक दांपत्याने आयकर विवरणपत्र भरण्यासाठी 2025 सालचे पगार विवरणपत्र मागितले होते. हे विवरणपत्र देण्यासाठी मुख्याध्यापिका विद्या बळवंत वांगे यांनी प्रत्येकी 600 रुपये, म्हणजेच दोघांचे मिळून 1200 रुपये मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे. इतकेच नव्हे तर या मागणीसाठी दोन सहशिक्षकांनीही सक्रिय भूमिका बजावली. याचा अर्थ भ्रष्टाचाराची पाळेमुळे शिक्षण क्षेत्रात विशेषतः जिल्हा परिषद शाळांच्या प्रशासनामध्ये व व्यवस्थेमध्ये किती खोलवर रुजलेली आहेत हे या घटनेमुळे अधोरेखित होत आहे. तक्रारदार शिक्षक दांपत्याने 26 जानेवारी रोजी मुख्याध्यापिका वांगे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांनी थेट लाचेची मागणी केली. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर 29 जानेवारी रोजी उस्मान नगर शाळेत सापळा रचण्यात आला.
तक्रारदार शाळेत पोहोचल्यावर मुख्याध्यापिका वांगे यांनी त्यांना सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे यांच्याकडे पाठवले. सोनकांबळे यांनी दोघांचे 1200 रुपये मुख्याध्यापिकेला देऊन टाका असे स्पष्टपणे सांगत लाच देण्यास प्रोत्साहन दिले. पुढे मुख्याध्यापिका वांगे यांनी सहशिक्षक रामेश्वर शामराव पांडागळे यांना बोलावून घेतले आणि फोनपेवर पैसे टाका असा सल्ला दिला. मात्र तक्रारदारांनी फोन पे चालत नसल्याचे सांगून नगदी पैसे आणतो असे सांगितले. यानंतर ठरल्याप्रमाणे तक्रारदारांनी शाळेच्या कार्यालयात सहशिक्षक पांडागळे यांच्याकडे 1200 रुपये दिले. बाराशे रुपये आहेत का? अशी खात्री करून घेत पांडागळे यांनी स्वतःसाठी आणि मुख्याध्यापिका वांगे यांच्यासाठी लाच स्वीकारली. त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा टाकून मुख्याध्यापिका विद्या वांगे, सहशिक्षक रामेश्वर पांडागळे आणि सहशिक्षक गौतम सोनकांबळे यांना रंगेहात पकडले. ही कारवाई केवळ एका शाळेपुरती मर्यादित नाही, तर नांदेड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील कुजलेल्या व्यवस्थेचे भयावह चित्र उघड करणारी आहे. पगार विवरणपत्र, बदली, सेवा पुस्तक, प्रमोशन, मान्यता, वेतनवाढ यासाठी शिक्षकांकडून सर्रास पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र शिक्षणाधिकार्यांकडून यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे. आज प्रश्न असा आहे की, शिक्षणाधिकारी नेमके काय करतात? कार्यालयात बसून फाईल्सवर सही करणे म्हणजे प्रशासन नाही. शाळांची प्रत्यक्ष तपासणी, शिक्षक-मुख्याध्यापकांच्या कारभारावर वचक, आणि भ्रष्टाचाराविरोधात कडक पावले उचलणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण नांदेडमध्ये मात्र शिक्षणाधिकारी कार्यालयात बसून वाटाघाटी करणारे दलाल झाले आहेत, असा संतप्त आरोप शिक्षक व पालक वर्गातून केला जात आहे. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण विभागाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे. विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, नीतीमूल्ये शिकवणारेच जर लाच घेत असतील, तर पुढील पिढीकडून आपण काय अपेक्षा ठेवायची? नांदेड जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेवरचा जनतेचा विश्वास हादरला असून, आता केवळ किरकोळ कारवाई करून भागणार नाही.. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी, संबंधित शाळेतील इतर व्यवहारांची तपासणी करावी, तसेच जिल्हाभरातील शाळांमध्ये विशेष ऑडिट करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा, नांदेडचे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराने बरबटले आहे हा आरोप भविष्यात आणखी ठळक होत जाणार, हे निश्चित.
घटना स्थळ : उस्माननगर, कंधार तालुका, नांदेड लाच मागणी : प्रत्येकी 600 रुपये (एकूण 1200 रुपये) आरोपी : विद्या बळवंत वांगे – मुख्याध्यापिका रामेश्वर शामराव पांडागळे – सहशिक्षक गौतम जयवंतराव सोनकांबळे – सहशिक्षक कारवाई करणारी संस्था : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गुन्हा नोंद : उस्माननगर पोलीस ठाणे तपास अधिकारी : पोलीस निरीक्षक करीम खान पठाण

COMMENTS