७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या
७ फेब्रुवारीला मतदान, ९ फेब्रुवारीला मतमोजणी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, यापूर्वी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असून, मतमोजणीची तारीख ७ फेब्रुवारीऐवजी ९ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदांअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असून, राज्य निवडणूक आयोगाने यासाठी १३ जानेवारी २०२६ रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, छाननी, नामनिर्देशन मागे घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप तसेच अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता केवळ मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा हे टप्पे शिल्लक आहेत.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६ नंतर केवळ दोन आठवड्यांची अतिरिक्त मुदत दिली आहे. अशा परिस्थितीत, २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्य शासनाने २८ ते ३० जानेवारीदरम्यान शासकीय दुखवटा जाहीर केला. या कालावधीचा विचार करून निवडणूक कार्यक्रमात आवश्यक ते बदल करण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित जिल्हाधिकारी ३१ जानेवारी २०२६ रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. नव्या वेळापत्रकानुसार ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
यासोबतच, जाहीर प्रचाराची मुदत ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १० वाजता संपणार आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता तत्काळ उठवली जाईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत शासन राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत.

COMMENTS