Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शंभर टक्के निधी खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करा

पालकमंत्री विखे पाटील ; जिल्हा वार्षिक योजनेच्या ७५६ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता अहिल्यानगर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२६-२७ या

मुख्यत्र्यांची सभा युतीच्या विजयाची नांदी ठरेल : माजी खा. विखे
विज्ञान प्रदर्शनाचे अनुदान वाढल्याने संशोधन वृत्तीला बळ
जिल्हा दुष्काळमुक्तीसाठी स्व. बाळासाहेब विखेंनी सातत्याने संघर्ष केला

पालकमंत्री विखे पाटील ; जिल्हा वार्षिक योजनेच्या ७५६ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मान्यता

अहिल्यानगर : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या ७५६ कोटी ४३ लक्ष रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली असून, मार्च अखेरपर्यंत प्राप्त होणारा संपूर्ण निधी १०० टक्के खर्च करून गुणवत्तापूर्ण कामे करावेत. प्रशासकीय विभागांनी विकास प्रस्ताव तयार करताना स्थानिक लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय ठेवावा. अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला आमदार किशोर दराडे, आ.सत्यजित तांबे, आ.मोनिका राजळे, आमदार किरण लहामटे,  आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे, आ. आशुतोष काळे, आ. अमोल खताळ, आ. विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर व विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 बैठकीत सन २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला. या वर्षासाठी जिल्ह्याकरिता एकूण १०२७ कोटी ३१ लक्ष रुपये नियतव्यय मंजूर असून, त्यापैकी ८०१ कोटी ३७ लक्ष रुपये किमतीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. शासनाकडून प्राप्त ५६९ कोटी ९० लक्ष निधीपैकी २२८ कोटी १२ लक्ष रुपये कार्यान्वयीन यंत्रणांना वितरीत करण्यात आले आहेत. निधी व्यपगत होणार नाही याची दक्षता घेऊन मंजूर आराखड्यानुसार ३१ मार्चपूर्वी १०० टक्के प्रशासकीय मान्यता देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी नियोजन विभागाला केल्या. चालू आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडील विविध योजनांसाठी २५४ कोटी २७ लक्ष रुपये, तर नगरपालिका व नगरपंचायतींमधील योजनांसाठी ७६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

  विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, यासाठी जिल्हा विज्ञान प्रदर्शनासाठीची तरतूद ५ लाखांवरून १ कोटी रुपये करण्यात आली आहे.   वन विभागाच्या बळकटीकरणासाठी मंजूर ९ कोटी निधीतून नाईट व्हिजन दुर्बिणी, थर्मल ड्रोन्स व वाहनांची उपलब्धता झाली असून, बिबट्या रेस्क्यू सेंटरचा सविस्तर प्रस्ताव शासनास त्वरित सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

 नोव्हेंबर २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण होणाऱ्या भंडारदरा धरणाच्या शताब्दी महोत्सवासाठी व तेथील ब्रिटीशकालीन विश्रामगृह व उद्यानाच्या नूतनीकरणासाठी पर्यटन विभागाकडे सादर केलेल्या ६८ कोटींच्या प्रस्तावाचा मंत्रिमंडळ स्तरावर पाठपुरावा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव व संगमनेर येथील भाविकांच्या सोयीसुविधांसाठी कुंभमेळा निधीतून तरतूद करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

 

– ‘शौर्य स्तंभा’साठी ५ कोटींची तरतूद : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील ‘धर्मवीर गडावर’ छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भव्य ‘शौर्य स्तंभ’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

– पासपोर्ट कार्यालय नूतनीकरण : अहिल्यानगर येथील पासपोर्ट कार्यालयाच्या अद्ययावत नूतनीकरणासाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे.

– गणित – विज्ञान प्रदर्शन : जिल्हा परिषदेचे विद्यार्थी विज्ञानात उत्तम प्रगती करत आहेत. त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्यासाठी, जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे ५ लाखांचे अनुदान वाढवून थेट १ कोटी रुपये करण्यात आले आहे. गरज भासल्यास यासाठी आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

– आगामी वर्षाचा आराखडा (२०२६-२७) : आगामी २०२६-२७ या वर्षासाठी ७५६ कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे आपल्याला ८३० कोटी रुपये मिळाले होते. त्याच धर्तीवर, यंदा हा निधी वाढवून १ हजार कोटी रुपयांपर्यंत मिळावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

COMMENTS