मनसेचा आक्रमक पवित्रा ; त्याच जागी पुन्हा स्टॉल उभारण्याची सूचनाठाणे ः डोंबिवलीत स्टेशन परिसरात व्यवसाय करणार्या एका मराठी तरुणीचा शॉरमा विक्रीचा स्ट
मनसेचा आक्रमक पवित्रा ; त्याच जागी पुन्हा स्टॉल उभारण्याची सूचना
ठाणे ः डोंबिवलीत स्टेशन परिसरात व्यवसाय करणार्या एका मराठी तरुणीचा शॉरमा विक्रीचा स्टॉल कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अधिकार्यांनी हटवल्याची घटना समोर आली आहे. या कारवाईनंतर संबंधित तरुणीने सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे आपली व्यथा मांडली. या व्हिडिओची मनसेने गंभीर दखल घेत, त्या तरुणीला पूर्वीच्याच ठिकाणी पुन्हा स्टॉल उभारण्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. या घटनेमुळे डोंबिवलीतील फेरीवाले, मराठी उद्योजक आणि पालिकेची कारवाई यावर पुन्हा एकदा राजकीय व सामाजिक वाद पेटला आहे.
डोंबिवलीतील एकता सावंत ही तरुणी सोशल मीडियावर मोठी ओळख असलेली रील क्रिएटर असून, तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. डोंबिवली स्टेशनबाहेर ती शॉरमा विक्रीचा व्यवसाय करत होती. मात्र, अलीकडे महापालिकेने केवळ तिच्याच स्टॉलवर कारवाई केल्याचा आरोप तिने केला आहे. यामुळे व्यथित होऊन तिने एक व्हिडिओ पोस्ट करत आपल्यावर झालेल्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. दररोज हप्ता दिला जात असतानाही आपल्यावरच कारवाई करण्यात आली, तर इतर फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप तिने या व्हिडिओत केला आहे. एकताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर मनसेने या प्रकरणात हस्तक्षेप केला. पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर, मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी डोंबिवलीत प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी संबंधित तरुणीला घाबरू नका, त्याच जागी पुन्हा स्टॉल लावा, असे स्पष्ट सांगितले. यावेळी बोलताना अविनाश जाधव यांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत म्हटले की, डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही, मात्र मराठी तरुणीवरच एकतर्फी कारवाई केली जाते. हा अन्याय सहन केला जाणार नाही. व्यवसाय करणार्या मराठी तरुणीच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी आहे, असा ठाम संदेश त्यांनी दिला.
मराठी माणूस रडत नाही, तो लढतो
या प्रकरणामुळे भावनिक झालेल्या तरुणीने आंदोलनाचा इशारा दिला असता, जाधव यांनी तिला धीर देत आंदोलनाची गरज नसल्याचे सांगितले. तू निर्धास्तपणे उद्यापासून व्यवसाय सुरू कर, कुणी अडचण निर्माण केली तर कार्यकर्त्यांना कळव, आवश्यक झाल्यास मी स्वतः येथे येईन, असे त्यांनी सांगितले. मराठी माणूस रडत नाही, तो लढतो, असे म्हणत त्यांनी त्या तरुणीला आत्मविश्वास दिला.
फेरीवाला प्रश्न पुन्हा ऐरणीवर
उल्लेखनीय बाब म्हणजे, कल्याण-डोंबिवली परिसरात फेरीवाल्यांचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्टेशन परिसरासह प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून, याबाबत मनसेने यापूर्वीही वारंवार आवाज उठवला आहे. मराठी उद्योजकांवर होणारी कारवाई आणि इतरांवरील दुर्लक्ष यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

COMMENTS