मित्रपक्षांच्या दबावाला नकार देत भाजपची सत्तास्थापनेची तयारीमुंबई : देशातील सर्वाधिक अर्थसंपन्न आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिके

मित्रपक्षांच्या दबावाला नकार देत भाजपची सत्तास्थापनेची तयारी
मुंबई : देशातील सर्वाधिक अर्थसंपन्न आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुंबई महानगरपालिकेतील सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडताना दिसत आहे. मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर भारतीय जनता पक्षाचाच उमेदवार विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, येत्या 30 जानेवारी रोजी भाजपकडून महापौर निवडीचा मुहूर्त ठरल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे अनेक दशकांपासून मुंबईवरील सत्ता मिळवण्याचे भाजपचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.
दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, भाजपच्या नव्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या कार्यकाळाची सुरुवात मुंबईसारख्या प्रतिष्ठेच्या महानगरपालिकेवरील विजयाने व्हावी, अशी स्पष्ट रणनीती आखण्यात आली आहे. भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी मंगळवारी अधिकृतपणे पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच या संदर्भातील हालचालींना वेग आला. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शपथविधीसाठी मुंबई व महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत उपस्थित होते. याच बैठकीत मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेचा आराखडा अंतिम करण्यात आला. मुंबईचा महापौर भाजपचाच असणार, हा संदेश हायकमांडकडून स्पष्टपणे देण्यात आल्याचे समजते. पक्षाने दीर्घकाळ या पदाची प्रतीक्षा केली असून, आता कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका दिल्लीतील नेतृत्वाने घेतली आहे. मित्रपक्षांना सन्मानाने सोबत ठेवावे, मात्र महापौरपदावरील दावा सोडू नये, असे स्पष्ट निर्देश राज्य नेतृत्वाला देण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला 114 चा आकडा गाठण्यासाठी भाजपला मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांच्या 29 नगरसेवकांचा पाठिंबा मिळत असून, महायुतीकडे एकूण 118 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग भाजपसाठी सुकर झाला आहे.
या संख्याबळाच्या जोरावर शिंदे गटाने सुरुवातीला महापौरपदावर दावा करण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदासह स्थायी समिती आणि ‘बेस्ट’सारख्या महत्त्वाच्या समित्यांमध्ये मोठा वाटा देण्याची मागणी त्यांनी केल्याची चर्चा होती. मात्र, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने हे दबावतंत्र साफ धुडकावून लावले आहे. दिल्लीतील नेतृत्वाने स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे आता महायुतीतील सत्तावाटपाचे सूत्र जवळपास ठरले असून, मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपचा महापौर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चौकट———–
30 जानेवारीला होणार मुंबईचा महापौर
सूत्रांच्या माहितीनुसार, 30 जानेवारी रोजी भाजप मुंबई महापालिकेत आपला महापौर बसवून सत्तेचा अधिकृत ताबा घेईल. याच दिवशी गटनेते, महत्त्वाच्या वैधानिक समित्या आणि प्रशासकीय निर्णयांवरही भाजप आपले वर्चस्व प्रस्थापित करेल. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू होणार आहे.

COMMENTS