प्रजासत्ताक दिनी साकारणार ‘आत्मनिर्भर गणेशोत्सव’चा भव्य चित्ररथनवी दिल्ली : 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज

प्रजासत्ताक दिनी साकारणार ‘आत्मनिर्भर गणेशोत्सव’चा भव्य चित्ररथ
नवी दिल्ली : 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या भव्य सोहळ्यासाठी राजधानी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. राष्ट्रीय गीत *‘वंदे मातरमला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर यंदाचा प्रजासत्ताक दिन विशेष ऐतिहासिक ठरणार आहे. या राष्ट्रीय संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेतून राज्याच्या सांस्कृतिक परंपरा, सामाजिक शक्ती आणि आर्थिक सामर्थ्याचे प्रभावी दर्शन घडवणार आहे.
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांनी या सोहळ्याच्या तयारीविषयी अधिकृत माहिती दिली. यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत कर्तव्यपथावर भारताच्या लष्करी सामर्थ्यासह सांस्कृतिक समृद्धीचे भव्य प्रदर्शन सादर होणार आहे. यंदाच्या संचलनात देशभरातील एकूण 30 चित्ररथ सहभागी होणार असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ विशेष आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून रुजवलेल्या सामाजिक एकात्मतेच्या विचारातून आज आधुनिक भारत कसा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथातून साकारले जाणार आहे. गणेशोत्सवामुळे निर्माण होणारी कोट्यवधींची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकार आणि विविध घटकांना मिळणारा रोजगार तसेच त्यातून उभी राहिलेली आर्थिक साखळी या संकल्पनेचा केंद्रबिंदू असेल. महाराष्ट्राची ओळख असलेली ढोल-ताशा पथके आणि सामाजिक सलोखा यातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा संदेशही दिला जाणार आहे.
लष्करी सामर्थ्याच्या प्रदर्शनात यंदा प्रथमच ‘बॅटल रे’ ही आधुनिक युद्धरचना सादर केली जाणार आहे. यामध्ये अर्जुन टँक, टी-90 भीष्म रणगाडे, राफेल लढाऊ विमाने तसेच स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे चित्तथरारक दर्शन घडेल. संचलनात 18 लष्करी तुकड्या, 13 बँड्स आणि एकूण 30 चित्ररथ सहभागी होणार आहेत. या सोहळ्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे 2,500 कलाकार सहभागी होणार असून, ऑस्कर विजेते संगीतकार एम. एम. कीरावानी यांचे संगीत आणि ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांचा भारदस्त निवेदनस्वर कार्यक्रमाला लाभणार आहे. यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा ‘जनभागीदारी’ या संकल्पनेवर आधारित असून, इस्रोचे शास्त्रज्ञ, ‘लखपती दीदी’ आणि प्रगत शेतकरी अशा 10,000 विशेष पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ‘राष्ट्रपर्व’ हे विशेष पोर्टल आणि मोबाईल प विकसित करण्यात आले असून, तिकीटधारकांसाठी दिल्ली मेट्रोचा प्रवास मोफत ठेवण्यात आला आहे. संचलनानंतर 26 ते 31 जानेवारीदरम्यान लाल किल्ल्यावर *‘भारत पर्व’*चे आयोजन करण्यात येणार असून, तेथेही महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीचा अनुभव घेण्याची संधी देशवासियांना मिळणार आहे.

COMMENTS