Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाडक्या बहिणींचा थकीत हप्त्यांवरून भंडार्‍यात उद्रेक

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवचत केले ठिय्या आंदोलनभंडारा ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे मानधन लाभार

लाडक्या बहिणींना मिळाले एकाच महिन्याचे पैसे
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा
लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात ; डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवचत केले ठिय्या आंदोलन
भंडारा ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांचे मानधन लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक महिलांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. याच नाराजीचा उद्रेक शनिवारी भंडारा जिल्ह्यात पाहायला मिळाला. संतप्त महिलांनी थेट मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवत ठिय्या आंदोलन केल्याने परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली.
भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात सकाळपासून महिलांनी महामार्गावर ठाण मांडल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. काही वेळातच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. अवजड वाहने, खासगी कार तसेच प्रवासी बस अडकून पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. अचानक झालेल्या चक्काजाममुळे प्रशासनाची धावपळ उडाल्याचे चित्र होते. आंदोलनादरम्यान महिलांनी सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. दोन महिन्यांचे पैसे कुठे गेले? असा थेट सवाल करत, निवडणुकीआधी एकत्रित मानधन देण्याचे दिलेले आश्‍वासन हवेत विरल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक पात्र महिलांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. तातडीने रक्कम जमा न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशाराही काही महिलांनी दिला.
दरम्यान, या योजनेअंतर्गत काही लाभार्थी महिलांची नावे अचानक यादीतून वगळली गेल्याचेही समोर आले आहे. तांत्रिक अडचणी, कागदपत्रांतील त्रुटी किंवा माहिती अपलोड करताना झालेल्या चुका यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात असले, तरी योजना आमच्यासाठी आहे, मग चुका आम्हीच का भोगायच्या? असा सवाल आंदोलक महिलांनी उपस्थित केला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस व प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महिलांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित खात्याशी समन्वय साधून तांत्रिक अडचणी दूर केल्या जातील आणि थकीत मानधन लवकरच खात्यात जमा केले जाईल, असे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच यादीतून वगळलेल्या महिलांची पुन्हा पडताळणी करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले. भंडार्‍यातील घटनेनंतर इतर जिल्ह्यांतही असाच असंतोष उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व पात्र महिलांना वेळेत आणि नियमित मानधन मिळेल यासाठी सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.


प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर आंदोलन घेतले मागे
प्रशासनाच्या आश्‍वासनानंतर काही वेळाने महिलांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली. मात्र या आंदोलनामुळे अनेक तास वाहतूक विस्कळीत राहिल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनचालकांनी प्रशासनाच्या नियोजनावर नाराजी व्यक्त केली.माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना मानली जाते. मात्र मानधनाच्या विलंबामुळे आणि यादीतील त्रुटींमुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे.

COMMENTS