Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुस्तकाचा गंध मस्तकात रुजला की माणूस घडतो-प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त तुलसी महाविद्यालयात व्याख्यानबीड । प्रतिनिधीडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाड

बीड सायबर पोलिसांची मोठी कामगिरी
Beed : परळी रेल्वेस्थानकात पाणीच पाणी (Video)
हार्टअटॅकने निधन झालेल्या खातेदाराच्या गोल्ड लोनचा इन्शुरन्स मंजूर; वारसदारांना दागिने सुपूर्त

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त तुलसी महाविद्यालयात व्याख्यान
बीड । प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला लाभल्यानंतर या विद्यापीठाचा दर्जा ज्ञानाने समृद्ध करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ज्ञानाची श्रीमंती वाढली, पुस्तकाचा गंध मस्तकात रुजला की माणूस घडतो, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व साहित्यिक प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त बुधवार (दि. 14) रोजी तुलसी शैक्षणिक समूह, बीड यांच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. हा कार्यक्रम तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नालंदा फाउंडेशन, बीडचे अध्यक्ष मा. प्रा. प्रदीप रोडे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रियदर्शी बहुजनवादी स्पर्धा परीक्षा केंद्राचे अध्यक्ष प्रा. अशोक गायकवाड तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त मा. उमेश सोनवणे उपस्थित होते. प्रा. डॉ. लुलेकर यांनी मराठवाड्याचा ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक प्रवास उलगडून सांगताना नमूद केले की, मराठवाडा हा दीर्घकाळ गुलामीत राहिलेला प्रदेश असून निजामशाहीच्या काळात शिक्षणाची मोठी पीछेहाट झाली. 1958 मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतरच या भागात उच्च शिक्षणाची खरी सुरुवात झाली. फुले-शाहू-आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असूनही समाज जातीवादातून पूर्णपणे मुक्त नसल्याने विद्यापीठाच्या नामांतराला तब्बल सतरा वर्षे विरोध झाला. अखेर 14 जानेवारी 1994 रोजी विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. बाबासाहेबांचे नाव मिळाल्यानंतर विद्यापीठाचा दर्जा उंचावण्याची जबाबदारी शिक्षक, विद्यार्थी व समाजावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये विद्यार्थी प्रवेश कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त करताना प्रा. लुलेकर म्हणाले की, शिक्षणाशिवाय समाजाच्या प्रगतीला कोणताही पर्याय नाही. केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर मुळातून ज्ञानसमृद्ध व्हावे लागते. समाजाने आपली मुले महाविद्यालये व विद्यापीठांत शिक्षणासाठी पाठवावीत, असे आवाहन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे उमेश सोनवणे यांनी शेक्सपियरच्या उदाहरणातून सांगितले की, गुलाबाला कोणतेही नाव दिले तरी त्याचा सुगंध कमी होत नाही. विद्यापीठाचा नामविस्तार हा केवळ नावाचा प्रश्न नसून तो आत्मसन्मान व स्वाभिमानाची लढाई असल्याचे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रदीप रोडे यांनी सांगितले की, ज्ञान हे आयुष्यभर उपयोगी पडते. ज्ञानप्राप्तीसाठी वाचन अत्यावश्यक आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांनी नियमित वाचन केल्यास वेगळे मार्गदर्शन करण्याची गरज भासत नाही. ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विकास वाघमारे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. योगिता लांडगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमास संस्थेच्या विविध शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS