Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपक्ष-एमआयएम-वंचितांचा फॅक्टर, क्रॉस वोटिंगचा धोका आणि पक्ष्यांच पॅनलमधून ‘एक मत’ स्वतःला मागण्याचा खेळ

नांदेड मनपा निवडणुकीत सत्तेची गणिते उलथापालथीच्या उंबरठ्यावर नांदेड । प्रतिनिधी नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असत

प्रभाग सहामधील भाजपाच्या चारही उमेदवारांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी साजरा केला आनंदोत्सव
निकाल अपेक्षेनुसारच विजय महायुतीचाच!
निवडणूक आयोगाकडून जनतेची दिशाभूल

नांदेड मनपा निवडणुकीत सत्तेची गणिते उलथापालथीच्या उंबरठ्यावर
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना राजकीय वातावरण प्रचंड तापले असून यंदाची निवडणूक केवळ भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील सरळ लढत न राहता अपक्ष उमेदवार, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी आणि मराठवाडा जनहित पार्टी यांच्या भूमिकेमुळे अत्यंत गुंतागुंतीची झाली आहे. कोण कोणाची मते कापणार, कोणाला फटका बसणार आणि कोणत्या प्रभागात पारंपरिक समीकरणे कोसळणार, यावरच नांदेडच्या राजकीय भवितव्याचा निकाल अवलंबून असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
यंदाच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांची संख्या लक्षणीय असून हे उमेदवार कोणत्याही एका पक्षाचे थेट विरोधक नसून सर्वच पक्षांच्या ‘कोअर वोट बँके’ला धक्का देण्याची क्षमता ठेवतात. विशेषतः ज्या प्रभागांमध्ये उमेदवारांची प्रतिमा, स्थानिक कामे आणि वैयक्तिक नेटवर्क मजबूत आहे, तेथे अपक्ष उमेदवार थेट प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. भाजपाचा पारंपरिक शहरी मध्यमवर्गीय मतदार, शिवसेनेचा भावनिक आणि संघटनात्मक मतदार, राष्ट्रवादीचा स्थानिक नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मतदार आणि काँग्रेसचा पारंपरिक निष्ठावंत मतदार – या सर्वांमध्येच अपक्ष उमेदवार ‘सॉफ्ट व्होट’ खेचताना दिसत आहेत. दुसरीकडे, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी यांचा प्रभाव काही विशिष्ट प्रभागांपुरताच मर्यादित असला तरी तो निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एमआयएमचा प्रभाव प्रामुख्याने अल्पसंख्याकबहुल भागांमध्ये दिसत असून याचा थेट फटका काँग्रेस आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीला बसण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव दलित, वंचित आणि तरुण मतदारांमध्ये असून हा वर्ग पारंपरिकरित्या राष्ट्रवादी व काँग्रेसकडे झुकणारा असल्याने वंचितची मते ही या दोन्ही पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरत आहेत. मराठवाडा जनहित पार्टीने स्थानिक प्रश्नांना हात घालत काही प्रभागांमध्ये प्रचाराला धार दिली असून याचा फटका विशेषतः प्रादेशिक नेतृत्वावर अवलंबून असलेल्या उमेदवारांना बसू शकतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर ‘क्रॉस वोटिंग’ हा सर्वांत मोठा आणि धोकादायक मुद्दा म्हणून पुढे आला आहे. अनेक प्रभागांमध्ये पॅनल पद्धतीने निवडणूक होत असताना मतदार चारही उमेदवारांना एकाच पक्षाचे मत देण्याऐवजी वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार निवडण्याची शक्यता वाढली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शेवटच्या टप्प्यात काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उघडपणे किंवा छुप्या पद्धतीने एक मत आम्हाला द्या, उरलेली तीन मते कुणालाही द्या असा प्रचार केल्याचे आरोप होत आहेत. हा प्रचार केवळ विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी नसून, अनेक ठिकाणी अंतर्गत गटबाजी, नाराज उमेदवार आणि वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठीच केला जात असल्याचे बोलले जात आहे. या ‘एक मत’च्या राजकारणाचा थेट फटका सर्वच पक्षांच्या पॅनलमधील काही उमेदवारांना बसण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः जे उमेदवार पक्षाच्या नावावर अवलंबून आहेत, ज्यांची वैयक्तिक ओळख किंवा जनसंपर्क कमी आहे, ते या क्रॉस वोटिंगचे पहिले बळी ठरू शकतात. याउलट, व्यक्तिगत कामगिरी, सततचा जनसंपर्क आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे उमेदवार पक्षाच्या विरोधात असतानाही निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी अपक्ष आणि वंचित-एमआयएमचा फॅक्टर भाजपाच्या शिस्तबद्ध मतदारांमध्ये फूट पाडू शकतो. शिवसेनेसाठी अंतर्गत विसंवाद आणि मित्र पक्षांतील आघाड्या डोकेदुखी ठरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस काही प्रभागांमध्ये मजबूत स्थितीत असली तरी वंचित व अपक्षांचा फटका त्यांना बसण्याची शक्यता अधिक आहे. काँग्रेससाठी तर ही निवडणूक ‘करो या मरो’ची असून एमआयएम आणि अपक्ष उमेदवार काँग्रेसच्या पारंपरिक मतांवरच डल्ला मारताना दिसत आहेत. एकूणच नांदेड महानगरपालिकेची ही निवडणूक सरळ राजकीय लढत न राहता मतांचे विभाजन, क्रॉस वोटिंग, अपक्षांचा दबदबा आणि स्वार्थी राजकारण यांचा गुंता बनली आहे. त्यामुळे 15 जानेवारीनंतर जाहीर होणारे निकाल अनेक प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारे, तर काही अनपेक्षित चेहर्‍यांना संधी देणारे ठरतील, अशीच चिन्हे सध्या स्पष्टपणे दिसत आहेत.

COMMENTS