मुंबई : महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, एकीकडे राजकीय पक्षांकडून प्रचाराचा जोर वाढत असतानाच मुंबईच्या जुहू परिसरातून

मुंबई : महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, एकीकडे राजकीय पक्षांकडून प्रचाराचा जोर वाढत असतानाच मुंबईच्या जुहू परिसरातून लोकशाही प्रक्रियेसाठी चिंताजनक संकेत मिळत आहेत. जुहू परिसरातील सुमारे 35 हजार नागरिकांनी येत्या महापालिका निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची जाहीर घोषणा करत त्यांनी आपल्या सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर बहिष्काराचे बॅनर लावले आहेत.
जुहू रुईया पार्क, कराची सोसायटी आणि आसपासच्या परिसरात असलेल्या जवळपास 200 इमारतींमधील रहिवाशांनी हा सामूहिक निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी आता थेट मतदानावर बहिष्काराचे अस्त्र उचलले आहे. जुहू परिसरात असलेल्या मिलिटरी रडार झोनमुळे या भागातील इमारतींचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही, असा नागरिकांचा दावा आहे. गेल्या 35 वर्षांपासून या भागातील सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. परिणामी, जवळपास 35 हजार नागरिक आजही अतिशय धोकादायक अवस्थेतील इमारतींमध्ये जीव मुठीत धरून राहत आहेत. या समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी वेळोवेळी केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे तसेच विविध यंत्रणांकडे निवेदने दिली, पाठपुरावा केला; मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
बॅनरमधून व्यक्त झाला संताप
मतदान बहिष्काराच्या निर्णयाबरोबरच नागरिकांनी लावलेल्या बॅनरवरून त्यांच्या असंतोषाची तीव्रता स्पष्टपणे दिसून येते. बॅनरवर ‘एसआरओ 150 हा कालबाह्य कायदा असून त्यामुळे आमची घरे उद्ध्वस्त होत आहेत’, तसेच ‘1939 च्या ब्रिटिशकालीन कायद्याच्या आधारे आम्हाला आमच्या कायदेशीर घरांपासून वंचित ठेवले जात आहे’ असे नमूद करण्यात आले आहे. या बॅनरमध्ये पुढे असेही म्हटले आहे की, सुमारे 200 इमारती आणि दोन झोपडपट्ट्या धोक्यात असून हजारो कुटुंबांवर अन्याय होत आहे. त्यामुळे नागरिकांना मतदानासाठी आवाहन करण्याआधी प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाने शंभर वेळा विचार करावा. ‘खोटी आश्वासने आता चालणार नाहीत’, असा ठाम इशाराही या बॅनरमधून देण्यात आला आहे.

COMMENTS